नमो सेंट्रल पार्कमध्ये मोजा पैसे; उद्धाटनानंतर लागलीच प्रवेश शुल्क जाहीर

By अजित मांडके | Published: February 8, 2024 06:46 PM2024-02-08T18:46:07+5:302024-02-08T18:47:14+5:30

कोलशेत, ढोकाळी भागात पीपीपी च्या माध्यमातून मनो सेंट्रल पार्क उभारण्यात आले आहे.

Count money in Namo Central Park entry fee will be announced immediately after the inauguration | नमो सेंट्रल पार्कमध्ये मोजा पैसे; उद्धाटनानंतर लागलीच प्रवेश शुल्क जाहीर

नमो सेंट्रल पार्कमध्ये मोजा पैसे; उद्धाटनानंतर लागलीच प्रवेश शुल्क जाहीर

ठाणे: कोलशेत, ढोकाळी भागात पीपीपी च्या माध्यमातून मनो सेंट्रल पार्क उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लागलीच या सेंट्रल पार्कचे तिकीट दरही जाहीर झाले असून त्याची अंमलबजावणी देखील तत्काळ केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार कोणत्या दिवशी किती शुल्क आकारले जाणार याचे दरपत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्याचशिवाय वाहन पार्कींगचे दरही जाहीर करण्यात आले आहे. १५ वर्षाखालील मुलांना मात्र पार्कमध्ये विनामुल्य प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नमो सेंट्रल पार्क २० एकरात साराकरण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवार पासून ते ठाणेकरांच्या सेवेतही रुजु होणार आहे. परंतु त्यापूर्वीच त्याचे दरही समोर आले आहेत. नमो सेंट्रल पार्क प्रत्येक सोमवारी देखभाल व दुरुस्ती कामासाठी बंद ठेवले जाणार आहे. त्याव्यतिरीक्त म्हणजेच मंगळवार ते रविवार या दिवशी सकाळी ६ ते ११ आणि दुपारी ४ ते रात्री ९ यावेळेत उद्यान खुले राहणार आहे. या पार्कचे प्रवेश शुल्क दर पालिका प्रशासनाने जाहिर केले आहेत. १५ वर्षाखालील मुलांना पार्कमध्ये विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. प्रौढांसाठी २० रुपये शुल्क असेल. तर, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रौढांसाठी ३० रुपये शुल्क असेल. 

ज्येष्ठ नागरिक प्रतिदिवस १० रुपये. पार्कमध्ये फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता मासिक पासची सुविधा ठेवण्यात आली असून सकाळच्या वेळेकरिता २५० रुपये तर, सकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळेसाठी ५०० रुपये इतकी मासिक पास रक्कम असेल. सायकल प्रवेश शुल्क २० रुपये इतके शुल्क असेल. त्याचबरोबर पार्किंगचे शुल्क जाहिर करण्यात आलेले आहेत. यानुसार चारचाकी वाहनांना ४ तासांकरिता ४० रुपये, चार तासानंतर प्रत्येक तासाला १० रुपये, दुचाकी वाहनांना २० रुपये, ४ तासानंतर प्रत्येक तासाकरिता १० रुपये आणि सायकलकरिता १० रुपये इतके शुल्क असेल, अशी माहिती महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने दिली.

Web Title: Count money in Namo Central Park entry fee will be announced immediately after the inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे