शिवसेना आणि भाजपकडून दावे प्रतिदावे
By अजित मांडके | Published: April 2, 2024 04:58 PM2024-04-02T16:58:07+5:302024-04-02T17:02:41+5:30
ठाणे लोकसभेवरुन आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शिंदे सेनेकडून अद्यापही उमेदवार जाहीर केला जात नाही. दुसरीकडे भाजप देखील ही जागा मिळावी यासाठी शक्ती प्रदर्शन करतांना दिसत आहे.
ठाणे :ठाणे लोकसभेची जागा कोणाला जाणार हे अद्यापही चित्र स्पष्ट नाही. त्यात आता इच्छुक मंडळींकडून मात्र शक्तीप्रदर्शन सुरु झाल्याचे दिसत आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आणि राहणार असल्याचा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. दुसरीकडे मला धणुष्य बाणावर लढण्याबाबत कोणतीही ऑफर नाही आणि आली तरी ती स्विकारणार नसल्याचा दावा माजी खासदार संजीव नाईक यांनी केला आहे.
ठाणे लोकसभेवरुन आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शिंदे सेनेकडून अद्यापही उमेदवार जाहीर केला जात नाही. दुसरीकडे भाजप देखील ही जागा मिळावी यासाठी शक्ती प्रदर्शन करतांना दिसत आहे. त्यात मागील काही दिवसापासून संजीव नाईक यांना शिंदे सेनेकडून धणुष्यबाणावर लढण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यावरुन अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. त्यात शिंदे सेनेकडून देखील अनेक इच्छुक असतांना भाजपमधला इच्छुक शिवसेनेकडून कशासाठी असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेच्या पदाधिकाºयांकडून ठाणे लोकसभेवर दावा कायम करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला जात आहे.
त्यात मंगळवारी माजी खासदार संजीव नाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहरातील वाहतुक कोडीं, पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी पावले उचलण्यासाठी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे. दरम्यान पत्रकारांशी बोलतांना त्यांना धणुष्यबाणाची ऑफर देण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर तशी कोणतीही ऑफर आपल्याला आलेली नाही आणि आली तरी त्याचा स्विकार करणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु वरीष्ठ पातळीवरील तीनही पक्षातील नेते जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील त्याच्यासाठी एकदिलाने काम करु असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवास्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान मिरा भाईंदरमधील निधी अभावी मिरा भाईंदरमधील थांबविण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ठाणे लोकसभेबाबत त्यांना छेडले असता, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे ठाणे लोकसभा ही शिवसेनेचेच असणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्यांच्यासाठी काम करु असेही त्यांनी सांगितले.