देशातील सर्वात मोठा पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रोजेक्ट भिवंडीत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 05:19 PM2018-08-28T17:19:46+5:302018-08-28T17:20:02+5:30

भिवंडी येथे पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारण्याच्या दृष्टीने पाऊले पडण्यास सुरुवात झाली

The country's largest powerloom mega cluster project will be set up in bhiwandi | देशातील सर्वात मोठा पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रोजेक्ट भिवंडीत होणार

देशातील सर्वात मोठा पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रोजेक्ट भिवंडीत होणार

Next

ठाणे : भिवंडी येथे पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारण्याच्या दृष्टीने पाऊले पडण्यास सुरुवात झाली असून, आज वस्त्रोद्योग सचिव अतुल पाटणे यांनी भिवंडी पॉवरलूम असोसिएशनच्या सदस्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत याविषयीची विस्तृत माहिती दिली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी देखील यावेळी बोलतांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी देणाऱ्या या प्रस्तावित हबसाठी जमीन उपलब्धता, तसेच इतर गोष्टींसाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

भिवंडीत निर्यात प्रोत्साहनसंदर्भात एक कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यावरही चर्चा झाली. बैठकीत वस्त्रोद्योग संचालक माधवी खोडे यांनी देखील या हबची माहिती दिली. एमआयडीसी स्पेशल पर्पज व्हेईकल करून त्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी झाल्यास विद्युत मंडळ, प्रदूषण नियंत्रण, महानगरपालिका, महसूल विभाग या व इतर शासकीय संस्थांशी समन्वय साधणे अधिक सोयीस्कर होईल असा विचार असल्याचे सांगून अतुल पाटणे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्ग, जेएनपीटी, दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरीडॉर यांचा विचार करून दळणवळणाच्या दृष्टीने योग्य जागेची निवड करावी. यासाठी सुमारे १५० एकर जागेची प्राथमिक आवश्यकता असून यामध्ये कॉमन फेसिलिटी सेंटर, पॉवरलूम प्रोसेसिंग, यार्न मार्केट, वर्क शेड्स, असतील. याशिवाय याठिकाणी वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्य विकास केंद्रे असतील. पॉवरलूम आधुनिकीकरण योजना याठिकाणी राबविण्यात येतील. सुताचा पुरवठा ते कापडाची निर्यात या संपूर्ण प्रक्रियेसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.  

कालबध्द रीतीने कार्यवाही व्हावी

भिवंडी येथे सुमारे ७ लाख पॉवरलूम्स असून १० लाखांपेक्षा जास्त कामगार यात थेट रोजगार मिळवितात अप्रत्यक्षरित्या ४० लाख लोकांचा जीवन चरितार्थ या उद्योगावर आहे. देशातील एकूण यंत्रमागांपकी ५० टक्के यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. त्यातही भिवंडीचा सर्वात अधिक वाटत असून पॉवरलूम संस्थांचे बळकटीकरण, कामगारांचे कल्याण मंडळ,यंत्रमाग संजीवनी योजना, परकीय गुंतवणूक अशा माध्यमातून या क्षेत्राच्या समस्या दूर करण्यात येत आहेत. भिवंडी येथे मेगा क्लस्टरच्या उभारणीने या भागाचा चेहरा मोहरा बदलेल मात्र कालबध्द रीतीने याची कार्यवाही व्हावी अशी मागणी बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी केली.

भिवंडीतील पायाभूत सुविधा, रस्ते, शौचालये आदी उपलब्ध करणे या बाबींवर देखील लक्ष्य केंद्रित करावे असे  पुरुषोत्तम वंगा, अध्यक्ष भिवंडी पद्मानगर पावरलूम व्हीवर्स यांनी सांगितले. माजी आमदार माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांनी देखील वीज वितरण कंपनीच्या ( टोरेंट) समस्या मांडल्या.

भिवंडी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी शहरातील रस्ते, पूल, स्वच्छता याबाबतीत प्राधान्याने कारवाई सुरु असून या  मेगा क्लस्टरच्या दृष्टीने पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे सांगितले.

भिवंडी प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी ५ सप्टेंबर रोजी प्रांत कार्यालयात सोयी सुविधांसंदर्भात सर्व  प्रतिनिधींसमवेत चर्चा करण्यात येईल असे सांगितले. बैठकीपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी माहिती दिली.  प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी चे अधिकारी यासाठी उपस्थित होते.

Web Title: The country's largest powerloom mega cluster project will be set up in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.