अभियंता जोडप्याने बांधली अनाथाश्रमात लग्नगाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 01:35 AM2020-06-15T01:35:02+5:302020-06-15T01:35:10+5:30
लग्नाचा सगळा खर्च सामाजिक संस्थांना
- पंकज पाटील
अंबरनाथ : लग्न म्हटलं की थाटामाटात होणारा समारंभ.. हौसमौज.. मोठा खर्च.. जेवणावळी.. पण, या सगळ्याला फाटा देत बदलापूरच्या एका जोडप्याने रविवारी अनाथाश्रमात आपली लग्नगाठ बांधली. कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत लग्नाचा सगळा खर्च सामाजिक संस्थांना दिला.
उल्हासनगरला राहणारा स्वप्नील देवकर आणि बदलापूरची प्राची शिर्के हे दोघेही अभियंते. खासगी कंपनीत काम करतात. दोघांचे एप्रिल महिन्यात लग्न ठरले, पण लॉकडाऊनमुळे ते मे महिन्यात ढकलले गेले. मे महिन्यातही लॉकडाऊन असल्याने हे लग्न १४ जून रोजी करण्याचे ठरले. स्वप्नील आणि प्राची हे एकुलते एक. त्यामुळे लग्न धूमधडाक्यात होणार हे ठरलेले होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही कुटुंबांतील मंडळींनी लग्न अनाथाश्रमात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भाजपचे नेते संभाजी शिंदे यांनी बदलापूरच्या सत्कर्म बालकाश्रमात व्यवस्था केली. यामागचा मूळ विचार होता तो म्हणजे खर्च वाचवून सामाजिक संस्थांना मदत करणे. सोशल डिस्टन्सिंंगचे पालन करत वºहाडींना फेसशिल्ड, मास्क देण्यात आले. अतिशय छोटेखानी पद्धतीने हा लग्नसोहळा रविवारी सत्कर्म बालकाश्रमात पार पडला. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे दोन्ही कुटुंबीयांनी सांगितले.