आदिवासी पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण; भिवंडीच्या दाम्पत्याचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 02:11 AM2020-08-15T02:11:18+5:302020-08-15T02:11:22+5:30
स्वातंत्र्याचा संबंध केवळ स्वत:च्या अधिकारांशी जोडणाऱ्या समाजाला या दाम्पत्याची सेवावृत्ती निश्चितच प्रेरणादायी आहे.
- नितीन पंडित
भिवंडी : कोरोनामुळे शहरात आॅनलाइन शिक्षण सुरू झाले असले, तरी ग्रामीण भागात अशा शिक्षणात अडथळे येत आहेत. त्यात आदिवासी विद्यार्थी तर या आॅनलाइन शिक्षणापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहता, भिवंडीतील एक दाम्पत्य आपली नोकरी सांभाळून एप्रिलपासून या विद्यार्थ्यांना पाड्यांवर जाऊन शिकवण्याचे काम करत आहे. स्वातंत्र्याचा संबंध केवळ स्वत:च्या अधिकारांशी जोडणाऱ्या समाजाला या दाम्पत्याची सेवावृत्ती निश्चितच प्रेरणादायी आहे.
श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते व वकिलीचे शिक्षण घेत असलेले रूपेश सोनावणे व त्यांची पत्नी रेश्मा पालिकेत सफाई कामगार म्हणून काम करते. एका बाजूला कोविडयोद्धा म्हणून काम करत असताना हे दाम्पत्य दुसरीकडे सामाजिक बांधीलकी जपत आहे. भरे गावात राहणारे रूपेश हे वकिलीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. रेश्मा यांना सुरुवातीपासूनच शिकविण्याची आवड असल्याने त्यांनी आपले डीएडपर्यंत शिक्षणही पूर्ण केले. मात्र, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी शिक्षिका बनण्याचे स्वप्न बाजूला ठेवत सफाई कामगार म्हणून काम सुरू केले.
कोरोनाच्या काळात आदिवासी मुलांना शिकवून त्यांनी आपला शिक्षकी पेशाही सुरू ठेवला आहे. सकाळी सफाई कामगार म्हणून नोकरी, तर दुपारपासून संध्याकाळपर्यंत आदिवासी मुलांना हे दोघे शिकवतात. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक अडचणी येतात. त्यातच कोरोनामुळे सुरू झालेले आॅनलाइन शिक्षण या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना शिकवून मनाला समाधान मिळते, अशी प्रतिक्रि या या दोघांनी दिली.
धड्यांबरोबरच विद्यार्थ्यांना कविता, शारीरिक शिक्षण, वैयक्तिक स्वच्छता, मास्क वापरणे, कवायत असे प्रकारही शिकविले जातात. मुलांवरील शिक्षणाचा ताण कमी करण्यासाठी गाण्यांवर नाचायलाही सांगितले जाते. यामुळे शाळेत येण्याची विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाली.
४० ते ५० विद्यार्थी घेतात शिक्षण : सुरु वातीला १५ ते २० विद्यार्थी शिकण्यासाठी यायचे. मात्र, मुलांना शिकविण्याची पद्धत आवडल्याने सध्या ४० ते ५० विद्यार्थी येत आहेत. आदिवासीपाड्यावरील मुलांना आॅनलाइन शिक्षणाबद्दल काहीच ज्ञान नाही. त्यांच्याकडे मोबाइल नाही. अनेकांच्या घरांत टीव्हीही नाही. शिवाय, गावात इंटरनेट नेटवर्क नसल्याने आॅनलाइन शिक्षण घ्यायचे कसे, असा प्रश्न मुलांना पडला आहे. सोनावणे दाम्पत्याने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा रखडलेला अभ्यास पूर्ण केला आहे.