पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले, इंजिन डबे सोडून पुढे गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 10:27 AM2019-03-07T10:27:17+5:302019-03-07T11:16:45+5:30
ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी (7 मार्च) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
ठाणे - ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी (7 मार्च) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस ही काही डबे मागे ठेऊन धावल्याची घटना समोर आली आहे. कल्याणच्या पत्रीपूल परिसराजवळ हा प्रकार घडला. पंचवटी एक्स्प्रेस या गाडीचे इंजिनपासून दोन डबे पुढे धावले आणि अन्य डबे मागेच थांबले आहेत.
कल्याण जवळ पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले. गाडीचे डबे मागे ठेऊन इंजिन पुढे निघून गेले. #PanchavatiExpress
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 7, 2019
गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे काही डब्बे मागे राहील्याची बाब लक्षात येताच तातडीने एक्स्प्रेस थांबवण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कपलिंग दुरुस्त करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेवर जलद मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला असून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कपलिंग तुटण्याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. वर्षभरापूर्वी दिवा डोंबिवली मार्गावर ही अशीच घटना घडली होती. काही डबे मागे सोडून लोकल धावली होती.
कल्याण, डोंबिवलीहून दररोज सकाळी हजारो प्रवासी सीएसटीएमच्या दिशेने प्रवास करतात. मात्र आज सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर सीएसएमटीहून कल्याणकडे जाणारी वाहतूकही उशिराने सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी शहाड रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. रुळाला तडे गेल्याने कसारा मार्गावरील लोकल व लांब पल्ल्याची वाहतूक कोलमडली होती. त्याचा फटका घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना बसला होता. तसेच घटनेमुळे राज्यराणी, पंचवटी आणि विदर्भ या लांब पल्ल्यांच्या गाड्या खोळंबल्या होत्या.