प्रदूषणाविरोधात आता न्यायालयीन लढा; प्रदूषण मंडळ, एमआयडीसीला बजावणार नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:06 AM2020-01-14T01:06:15+5:302020-01-14T06:25:49+5:30
हवा शुद्धतेसाठी ५०० यंत्रांचा प्रस्ताव
डोंबिवली : प्रदूषणामुळेडोंबिवलीतील नागरिक त्रस्त झाले असून त्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. शिवाय, काही भागांत नाल्यांमध्ये कारखान्यांतील दूषित पाणी प्रक्रि या न करताच सोडले जात असल्याने प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोणतीही उपाययोजना होत नसल्याने यासंदर्भात शहरातील दक्ष नागरिकांनी प्रदूषण मंडळ, एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्ष समितीने शनिवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्या नोटिशीचा मसुदा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
ज्यांना वैयक्तिक नोटीस पाठवायची असेल तर ते मसुद्याचा वापर करू शकतील, असेही ठरवण्यात आले आहे. सध्या पाच नागरिकांनी एकत्र येऊन आठवडाभरात नोटीस पाठविण्याचे ठरवले आहे. या नोटिशीला योग्य प्रतिसाद न मिळाल्यास पुढील न्यायालयीन प्रक्रि या सुरू करण्यासंदर्भातही निर्णय झाला आहे. त्याचबरोबर येत्या काही महिन्यांत शहरात ५०० एअर प्युरिफायर लावण्यासाठी अमोल चाफेकर या अभियंत्याने पुढाकार घेतला असून, याबाबत महापालिकेला त्या यंत्रांची सर्व माहिती सादर केली आहे.
प्रजासत्ताकदिनी नो-हॉर्न डे पाळावा, असा उपक्र म पै फ्रेण्ड्स लायब्ररीतर्फे राबवण्यात येणार आहे. २६ जानेवारीला मध्यरात्री १२ ते रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत वाहनचालकांनी हॉर्न न वाजवता गाडी चालवावी, असे आवाहन करण्यात येणार आहे. या संकल्पनेबाबत पै यांनी माहिती सांगत सर्व नागरिकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. याबाबतची बैठक बुधवारी रात्री ९.३० वाजता टिळकनगर शाळेसमोरील लायब्ररीच्या जागेत होणार आहे.
स्वच्छता अभियानात वाढता लोकसहभाग
स्वच्छ डोंबिवली अभियानांतर्गत गेल्या दिवसांमध्ये लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील सर्वोदयनगरातील अनेक सोसायट्यांनी एकत्र येऊन याबाबत काम सुरू केले आहे.
स्वच्छ डोंबिवली अभियानासंदर्भात महापालिकेच्या अधिकाºयांसोबत बैठक झाली असून, पूर्वेला पाच आणि पश्चिमेला पाच प्लास्टिक वेस्ट बँक असाव्यात, अशी रचना करण्याचे ठरविले आहे. स्वच्छतेसंदर्भात सोसायट्यांमध्ये जागृती करण्यासाठी प्रशिक्षित स्वच्छतादूत येतील. सभासदांना माहिती देतील, असेही सांगण्यात आले.