जनसुनावणी घेऊन न्यायालयाचा अवमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:59 AM2018-02-21T00:59:00+5:302018-02-21T00:59:02+5:30
श्रीनगर भागातील आपली बांधकामे अधिकृत असून ज्या प्रकरणाची सुनावणी न्यायप्रविष्ट आहे, त्याची जनसुनावणी घेणे हा न्यायालयाचा अवमान
ठाणे : श्रीनगर भागातील आपली बांधकामे अधिकृत असून ज्या प्रकरणाची सुनावणी न्यायप्रविष्ट आहे, त्याची जनसुनावणी घेणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे सांगून त्याविरोधात तक्रार करणारे प्रदीप इंदुलकर हे सुपारीबाज असल्याचा आरोप काँगे्रसचे शहर अध्यक्ष नगरसेवक मनोज शिंदे यांनी केला आहे.
वागळे इस्टेट भागातील श्रीनगरमधील चार बेकायदा बांधकामासंदर्भात प्रदीप इंदुलकर यांनी महापालिकेकडे तक्र ारी केल्या आहेत. त्यामध्ये श्रीनगर येथील कार्यालय आणि त्या मागील नाल्यावर झालेले बांधकाम, रमा माधव इमारतीसमोरील रिक्रिएशन ग्राउंडवर होणारे पार्किंग, आर्शिवाद बंगल्यात झालेले अनधिकृत बांधकाम आणि श्रीनगर मार्केट (श्री मंगल कार्यालय) येथे उभारण्यात आलेले मंडप या चार बांधकामांचा समावेश आहे. या बांधकामांबाबत निर्णय घेण्यासाठी महापालिकेने तेथील स्थानिक नागरिकांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी २१ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयात जनसुनावणी ठेवली आहे. या संदर्भात इंदुलकर यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यावर अद्यापही सुनावणी होणे शिल्लक आहे. परंतु, केवळ या अनधिकृत बांधकामांना वाचविण्यासाठी पालिकेने ही जनसुनावणी ठेवली असल्याचा आरोपही इंदुलकर यांनी केला आहे.
या बाबत अखेर शिंदे यांनी मौन सोडले असून या बांधकामांशी माझा कोणत्याही प्रकारचा संबध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वागळे इस्टेट भागात केवळ श्रीनगर हेच अधिकृत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. इंदुलकर यांनी मागील २५ वर्षांपासून या बाबत तक्रारी सुरू केल्या आहेत. परंतु, त्यांच्या हाती काहीच न लागल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.