ठाण्यात वडिलांच्या खूनप्रकरणी मुलाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने वर्षभरानंतर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:57 PM2018-09-30T22:57:52+5:302018-09-30T23:02:50+5:30
आपल्याच वडिलांना लहान भाऊ विलास याने घरातच उपाशीपोटी डांबून ठेवून त्यांचा खून केल्याचा आरोप मोठा भाऊ दिलीप पाटील याने केला आहे. याप्रकरणी त्याने न्यायालयात दाद मागितल्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे : जन्मदात्या वडिलांना उपाशीपोटी घरात डांबून ठेवून वर्षभरापूर्वी त्यांचा खून केल्याचा आरोप दिलीप पाटील (५४) यांनी धाकटा भाऊ विलास आणि भावजयीवर केला आहे. त्यांनी ठाणे न्यायालयात दाद मागितल्यानंतर कलम १५६ (३) अन्वये याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने कासारवडवली पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे तब्बल वर्षभरानंतर वडिलांच्या खुनाचा गुन्हा मुलाविरुद्ध दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र पाटील (८५) यांच्या मालकीचा कासारवडवली नाक्यावर एचपीसीएल कंपनीचा पेट्रोलपंप आहे. याच पेट्रोलपंपाच्या मालकीवरून दिलीप आणि विलास या दोन्ही मुलांसह वडिलांमध्ये अनेक वर्षांपासून वाद होता. या मालमत्तेमधील हरिश्चंद्र यांच्याकडे काही टक्के, तर दिलीप यांच्याकडे काही टक्के हिस्सा होता. पण, हरिश्चंद्र यांचे मोठा मुलगा दिलीप याच्याशीही बिनसले होते. त्यामुळेच ते धाकटा मुलगा विलास याच्याकडे वास्तव्याला होते. मध्यंतरीच्या काळात हरिश्चंद्र यांचे १५ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले. त्याचवेळी वडिलांना भेटू न दिल्याचा तसेच त्यांना उपाशी ठेवून हळूहळू विष देऊन मारहाण करून मारल्याचा आरोप दिलीपने विलासवर केला होता. यासंदर्भात त्यांनी अलीकडेच कासारवडवली पोलिसांकडेही तक्रार दिली होती. कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपींनी एकमेकांविरुद्ध मालमत्तेवरील वादाबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत.
दिलीप पाटील यांनी आता न्यायालयात धाव घेऊन याप्रकरणी धाकटा भाऊ विलास आणि त्याच्या पत्नीविरुद्ध २८ सप्टेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चौकशी सुरू असून न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.