पुलाचे काम १ आॅक्टोबरपासून सुरू न झाल्यास जाणार न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 03:03 AM2018-09-12T03:03:49+5:302018-09-12T03:03:56+5:30
कल्याण-भिवंडीला जोडणाऱ्या रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी खाडी पूल उभारण्याचे काम तीन महिन्यांपासून बंद होते.
कल्याण : कल्याण-भिवंडीला जोडणाऱ्या रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी खाडी पूल उभारण्याचे काम तीन महिन्यांपासून बंद होते. हे काम १ आॅक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले आहे. मात्र, हे काम सुरू न झाल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिला आहे.
सहा पदरी खाडी पुलाचे काम ११ मार्च २०१६ ला सुरू झाले. हे काम २४ महिन्यांत म्हणजे ११ मार्च २०१८ ला पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते मुदतीत झाले नाही. कामापूर्वी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार कंत्राटदाराने सादर केलेल्या आराखड्याला एमएमआरडीएने मंजुरी दिली. पुलाच्या प्रत्यक्ष कामाला आॅक्टोबर २०१६ मध्ये सुरुवात झाली. पुलाच्या बांधकामासंदर्भात काही बदल मेरिटाइम बोर्डाने सुचविले. त्यानुसार कंत्राटदाराने सुधारित रचना केली. एमएमआरडीएने त्याला १२ जुलै २०१७ ला मंजुरी दिली. त्यानंतर खºया अर्थाने कामाला सुरुवात केली. त्यामुळे पुलाचा कामाला विलंब झाला.
दरम्यान, तीन महिन्यांपासून पुलाचे काम कंत्राटदाराने बंद केल्याचा मुद्दा एमएमआरडीए आयुक्तांकडे झालेल्या आढावा बैठकीत उपस्थित झाला. त्यावर आयुक्तांनी कंत्राटदारांकडून काम बंद होते. आता १ आॅक्टोबरपासून कामाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. पुलाचे काम सुरू न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा पाटील यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिला आहे.