व्हीसीद्वारे नव्हे, आरोपींना प्रत्यक्ष हजर करा; गोळीबार प्रकरणात कोर्टाकडून पोलिसांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 04:38 PM2024-02-03T16:38:16+5:302024-02-03T16:39:53+5:30

कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीत गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत काय निर्णय दिला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Court instructs police in ulhasnagar bjp mla ganpat gaikwad vs mahesh gaikwad firing case | व्हीसीद्वारे नव्हे, आरोपींना प्रत्यक्ष हजर करा; गोळीबार प्रकरणात कोर्टाकडून पोलिसांना सूचना

व्हीसीद्वारे नव्हे, आरोपींना प्रत्यक्ष हजर करा; गोळीबार प्रकरणात कोर्टाकडून पोलिसांना सूचना

MLA Ganpat Gaikwad Firing ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि इतर पाच आरोपींना थोड्याच वेळात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी दोन्ही गटात वादंग होण्याची शक्यता तसेच आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार गायकवाड यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर ठेवलं जाणार होतं. मात्र या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत गणपत गायकवाड यांना कोर्टात प्रत्यक्ष हजर करा, अशा सूचना न्यायाधीशांनी पोलिसांना दिल्या आहेत.  

"मला या कृत्याचा पश्चाताप नाही. मी एक व्यावसायिक आहे. माझ्या मुलासाठी मी हे सगळं केलंय आणि कोणी माझ्या मुलालाच मारत असेल तर मी हे सहन करू शकत नाही. एक बाप म्हणून मी हे केलं आहे," अशी प्रतिक्रिया गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी दिली होती. त्यामुळे कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीत गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत काय निर्णय दिला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही वेळातच याप्रकरणातील सुनावणीला सुरुवात होणार आहे. 

पोलीस ठाण्यात थरार

भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले.  महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर रात्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्यानंतर ताबडतोब त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर महेश गायकवाड यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे ज्युपिटर हॉस्पिटलने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या पत्रकात त्यांच्यावर अतिदक्षता तज्ज्ञ, जनरल सर्जन, थोरॅसिक आणि ऑर्थोपेडिक सर्जन यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची तज्ज्ञ टीम बारकाईने लक्ष ठेवून आहे, असंही नमूद करण्यात आलं आहे. गायकवाड यांचे साथीदार राहुल पाटील यांच्यावरही रात्रीच तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते अतिदक्षता विभागात असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. 
 

Web Title: Court instructs police in ulhasnagar bjp mla ganpat gaikwad vs mahesh gaikwad firing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.