रत्नाकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
By admin | Published: August 27, 2015 12:09 AM2015-08-27T00:09:33+5:302015-08-27T00:09:33+5:30
२ जून रोजी इंदगाव येथील रत्नाकर महाराजांच्या साधना केंद्रात दरोडा टाकल्याचा गुन्हा बदलापूरचे नगरसेवक आशीष दामले यांच्यावर दाखल करण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणाला
बदलापूर : २ जून रोजी इंदगाव येथील रत्नाकर महाराजांच्या साधना केंद्रात दरोडा टाकल्याचा गुन्हा बदलापूरचे नगरसेवक आशीष दामले यांच्यावर दाखल करण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून या साधना केंद्रातील मठाचे संचालक नरेश रत्नाकर आणि ओंकार रत्नाकर यांच्यावरच हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश उल्हासनगर न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या प्रकरणात आशीष दामले हे नरेश रत्नाकर यांच्या साधना केंद्रात गेले असता या वेळी रत्नाकर यांनी गोळीबार केल्याचे दामले यांचे सहकारी व या प्रकरणातील फिर्यादी केतन शेळके यांनी कोर्टाला सांगितले होते. या फिर्यादीवरून उल्हासनगर येथील न्यायालयाच्या आदेशाने नरेश रत्नाकर व ओंकार रत्नाकर यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी रत्नाकर यांच्यावर बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. तसेच नरेश रत्नाकर यांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर हा आपल्या सोयीनुसार केल्याचेही कोर्टाने नमूद केले. दामले यांनी रत्नाकर महाराज यांच्या साधना केंद्रात दरोडा टाकल्याचा गुन्हा चांगलाच गाजला होता. तसेच या प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीतही होते. दरोड्याचा आरोप खोटा असल्याचे दामले यांनी या आधीच स्पष्ट केले होते. तसेच रत्नाकर महाराज हे गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे खुलासे आपण करणार असल्याचे त्यांनी या आधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर, आता रत्नाकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने दामले यांनी समाधान व्यक्त केले आहे.