न्यायालयाच्या आदेशाला सर्रास केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:25 AM2018-01-19T00:25:48+5:302018-01-19T00:25:59+5:30
बडे बिल्डर, उद्योजक व लोकप्रतिनिधींच्या कंपनीला बक्कळ फायदा होण्यासाठी मीरा भाईंदरच्या प्रारूप सीआरझेड नकाशामध्ये चक्क सोयीस्करपणे बदल केला आहे.
मीरा रोड : बडे बिल्डर, उद्योजक व लोकप्रतिनिधींच्या कंपनीला बक्कळ फायदा होण्यासाठी मीरा भाईंदरच्या प्रारूप सीआरझेड नकाशामध्ये चक्क सोयीस्करपणे बदल केला आहे. सीआरझेड वगळण्यासह कांदळवन, पाणथळ आदी क्षेत्र हटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात पर्यावरणाचा -हास केल्याप्रकरणी दाखल झालेले गुन्हे, प्रलंबित तक्रारी तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांनाही केराची टोपली दाखवत जमिनी मोकळया करण्याचा घाट प्रारुप नकाशात घालण्यात आला आहे.
ेमीरा- भाईंदर हे तसे पश्चिमेला अरबी समुद्र तर उत्तरेला वसई खाडी व दक्षिणेस जाफरी खाडीने व त्यातील उपखाड्या, कांदळवन, पाणथळ क्षेत्राने वेढलेले आहे. शहरात कांदळवनाचा मोठा पट्टा आहे.
कांदळवन, पाणथळ व सीआरझेड क्षेत्रामध्ये उच्च न्यायालयासह सरकार व कायदे नियमांनी भराव, बांधकामांना मनाई आहे. परंतु जमिनींना सोन्याचा भाव आल्याने कांदळवनाची तोड करणे, कचरा, मातीचा भराव करून भूखंड तयार करणे, बांध घालून भरतीचे पाणी अडवणे, बेकायदा बांधकामे करणे आदी प्रकार सतत चालतात.
शहरात कांदळवन -हासाचे गुन्हे दाखल असले तरी अनेक तक्रारी अजूनही प्रलंबित आहेत. महापालिकेने तर अनेक ठिकाणी पदपथ, गटार, रस्ता, दिवाबत्तीची सोय करून बेककायदा बांधकामे करणा-यांना प्रोत्साहन दिले आहे. शिवाय पाणी व वीजपुरवठा, कर आकारणी आदी सुविधा तत्परतेने पुरवल्या जात आहेत. कायदे नियमांसह उच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात सरकार व पालिका यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याने पर्यावरणाचा -हास सातत्याने सुरुच आहे. त्यातच सीआरझेड २०११ च्या सूचनेप्रमाणे नवीन सीआरझेड नकाशे तयार करताना त्यात बिल्डर, संबंधित लोकप्रतिनिधी आदींना प्रचंड फायदा होईल असे बदल करण्यात आले आहेत. प्रारूप नकाशावर हरकती व सूचनांची मुदतही १५ जानेवारीला संपुष्टात आली आहे. मीरा रोड पश्चिमेस मीठागर बंद करून त्या जागी केळयाची लागवड केली आहे. या भागात भरतीचे पाणी यायचे व पावसाळयात हे नैसर्गिक पाथणळ असायचे. या ठिकाणी खारफुटीची झाडेही होती व आजही काही आहेत. भरतीचे पाणी बंद करण्यासाठी मोठा भराव करून सीआरझेड, कांदळवन भागात डांबरी रस्ता तयार केला. पण आता हा मोठा भूखंड चक्क सीआरझेडमधून पूर्णत: वगळला आहे. उत्तनच्या कोपरा भागातील एस्सेल ग्रूपच्या जागेतील कांदळवनाचे मोठे जंगल नष्ट करण्यात आले. हा भाग देखील सीआरझेडमधून वगळून मोकळा केला आहे.
कनकिया भागात तर कांदळवन, पाणथळ, सीआरझेड व ना विकास क्षेत्रात सातत्याने खारफुटीची कत्तल करुन भराव टाकून भूखंड तयार केले. अनेक गुन्हे येथे दाखल झाले आहेत. पण पालिकेने गटार, रस्ते बांधले. इतकेच नव्हे तर अनेक बांधकाम परवानगीही दिल्या आहेत. आजही या भागात भराव केला जात आहे.
महापौर डिंपल यांचे पती विनोद मेहता यांच्यावर येथे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल असताना पालिकेने मेहतांच्या सेव्हन इलेव्हन हॉटेल्सला बांधकाम परवानगी दिली असून बांधकाम सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने कांदळवन सेलचे वरिष्ठ वासुदेव यांनी स्वत: या भागाची पाहणी करून अहवाल दिला आहे. त्यालाही पालिकेने राजकीय व बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी केराची टोपली दाखवली आहे. या भागातील सीआरझेड काढून टाकला असून कांदळवन, पाणथळ दाखवलेले नाही. येथील आरएनपी पार्क, सरस्वती नगर, शिवशक्ती नगर, नवघर गाव, इंद्रलोक वसाहत, हाटकेश न्यायालय, घोडबंदर, वसरसावे, पेणकरपाडा, सृष्टी, शांतीनगर, पूनमसागर कॉम्पलेक्स आदी भागांच्या मागील परिस्थितीही तशीच आहे.
पश्चिमेला खाडी धक्क्यापासून जयअंबेनगर, क्रांतीनगर, बजरंगनगर, गणेश देवलनगर, शास्त्री व नेहरूनगर, मुर्धा , राई , मोर्वा, डोंगरी, तारोडी, पाली, उत्तन, कोपरा, केशवसृष्टी मागील परिसर, नाझरेथ आगार, राधास्वामी सत्संग आदी भागात देखील सर्रास कांदळवन, पाणथळ, सीआरझेड क्षेत्राचा मोठा -हास करून पर्यावरण व जैवविविधतेचा नाश केला आहे. पण येथेही सीआरझेड, खारफुटी, पाणथळ आदी सोयीस्कररित्या टाळले आहे.