जिल्ह्यात अनेक शहरांत कोव्हॅक्सिनचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:37+5:302021-05-11T04:42:37+5:30
ठाणे : एकीकडे लसीकरणासाठी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी नागरिकांच्या रांगा लांबच लांब रांगा लागत आहेत, तर दुसरीकडे जिल्ह्याला अजूनही तुटपुंजा ...
ठाणे : एकीकडे लसीकरणासाठी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी नागरिकांच्या रांगा लांबच लांब रांगा लागत आहेत, तर दुसरीकडे जिल्ह्याला अजूनही तुटपुंजा लसींचा साठा मिळत आहे. सोमवारी जिल्ह्याला अवघ्या ३३ हजार ७०० लसी मिळाल्या. यामध्ये कोव्हॅक्सिनचा अठराशे साठा मिळाला आहे. तर १८ ते ४४ वयोगटांसाठी २३ हजार २०० आणि ४५ वर्षे वयोगटांपुढील नागरिकांसाठी आठ हजार ७०० कोव्हॅक्सिनच्या लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. अतिशय तुटपुंजा साठा मिळत असल्याने, ठाण्यात सोमवारी केवळ १८ ते ४४ वयोगटांसाठीच लसीकरण सुरू होते. त्या वयोगटांपुढील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. यात ठाणे आणि कल्याण-डोंबिवली वगळता, इतर शहरांना कोव्हॅक्सिनचा साठा देण्यात आलेले नाही.
काही दिवसांपासून लसीकरणाचा हा सावळा गोंधळ सुरू आहे. लसींच्या येणाऱ्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरण मोहिमेला खीळ बसल्याचे चित्र आहे. त्यातच काही दिवसांपासून १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू केल्याने केंद्रावरील गर्दी वाढत आहे, परंतु लसींचा साठाच अपुरा येत असल्याने लसीकरण केंद्राची संख्या कमी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विविध महापालिकांच्या ठिकाणी निम्यापेक्षा कमी लसीकरण केंद्र सुरू असल्याने ऑनलाइन बुकिंगसाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या पदरीही निराशा येत आहे. स्लॉट बुक होत नसल्याने लस मिळणार नाही. त्यामुळे लसीकरण ॲपवर नागरिकांची गर्दी झाली आहे.
आता जिल्ह्यासाठी कोविशिल्डचा ३१ हजार ९०० तर कोव्हॅक्सिनचा अठराशे लसींचा साठा मिळाला असून, तो ४५ वर्षे पुढील व्यक्तींसाठी वापरला जाणार आहे. त्यातून प्रत्येक महापालिकेला २०० पासून ते ५ हजारांपर्यंतचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम कशी राबवायची, असा पेच शासकीय यंत्रणांना सतावू लागला आहे. ठाण्यात सोमवारी अवघी दोनच केंद्र लसीकरणाची सुरू होती. त्या ठिकाणी दोन्ही सत्रांत १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरण सुरू होते, तर ४५ वयोगटांपुढील लसीकरण बंद ठेवले होते. असेच जर झाले, तर ठाण्यात लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षेही कमी पडतील, असेही बोलले जात आहे.
लसीकरण माहिती
कोविशिल्ड - १८ ते ४४-४५ पुढील - कोव्हॅक्सिन (४५ पुढील)
ठाणे ग्रामीण - ५,००० - २,००० - ५००
कल्याण डोंबिवली - ४,४०० - १,००० - २००
उल्हासनगर - १,२०० - २०० - -
भिवंडी - १,६०० - ४०० - --
ठाणे महापालिका - ५,००० - १,८०० - ६००
मीरा भाईंदर - २,५०० - १,६०० ---
नवी मुंबई - ३,५०० - १,७०० ----
------------------------------
एकूण -२३,२०० - ८,७०० - १,८००