कल्याण-डोंबिवली महापालिकेस ‘कोविड इन्होवेशन अवॉर्ड’ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:22+5:302021-06-26T04:27:22+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस केंद्र सरकारने कोविड इन्होवेशन अवॉर्ड जाहीर केले. देशातील १०० स्मार्ट सिटीमध्ये कल्याण डोंबिवली व वाराणसी ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस केंद्र सरकारने कोविड इन्होवेशन अवॉर्ड जाहीर केले. देशातील १०० स्मार्ट सिटीमध्ये कल्याण डोंबिवली व वाराणसी महापालिका ही नंबर वन ठरली असून, त्यांना विभागून हा पुरस्कार दिला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
कोविड काळात कोरोनावर मात करण्यासाठी स्मार्ट सिटींनी काय प्रयत्न केले याविषयीची माहिती मागविण्यात आली होती. पहिल्या दहा शहरात कल्याण डोंबिवलीची निवड करण्यात आली होती. सरकारने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरस्काराची घोषणा केली. यावेळी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोलरुममध्ये उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. केंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनी या पुरस्कारची घोषणा केली आहे.
कोरोना काळात कल्याण डोंबिवली महापालिककडे आरोग्याची अपुरी साधने असतानाही खासगी आणि महापालिकेच्या डॉक्टरांच्या मदतीने `डॉक्टर आर्मी` आणि `फॅमिली डॉक्टर कोविड फायटर` या संकल्पना राबवून कोरोनाशी समर्थपणे लढा दिला. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पोर्टल तयार करण्यात आले. त्यामुळे केडीएमसी कोविड इन्होव्हेशनमध्ये नंबर वन ठरली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
आयुक्तांनी म्हणाले की, स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानातही कल्याण डोंबिवली महापालिका पहिल्या दहामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिकेने प्रयत्न केले आहेत. महापालिका हद्दीतील नागरिकांना आरोग्याच्या पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यावर अधिक भर दिला आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची वाहतूक व्यवस्था, वाहतूक कोंडीमुक्त शहर, पार्क, गार्डन, सीसीटीव्ही, सिग्नल यंत्रणा, स्टेशन परिसर विकास या विविध योजना राबविल्या जाणार आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवलीत आरोग्य सेवा अपुऱ्या असताना शहरात `डॉक्टर आर्मी` स्थापन करून त्या माध्यामातून कोरोनावर मात करण्याचे काम करण्यात आले. देशातील ही पहिली डॉक्टर आर्मी होती. याचे सगळे श्रेय आयुक्त, प्रशासनातील डॉक्टर अधिकारी, नर्स, वॉर्डबॉय आदींना जाते. त्यांचा यात सिंहाचा वाटा आहे.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले होते. हे पोर्टल दिलीप करमरकर आणि सोहन राणे यांनी केले होते. पहिला रुग्ण महापालिका हद्दीत मार्च २०२० मध्ये सापडला होता. त्या दिवसानंतर सुरू करण्यात आलेल्या पोर्टलला दिवसाला सहा लाख हिट्स होत्या. हा पुरस्कार देताना पोर्टलच्या कामगिरीची केंद्र सरकारने दखल घेतली.
चौकट-
पहिल्या फेरीत देशातील शंभर स्मार्ट सिटीनी सहभाग घेतला होता. पहिल्या फेरीच्या बाद प्रक्रियेनंतर पुरस्कारासाठी दुसऱ्या फेरीत ४० शहरांपैकी केवळ कल्याण- डोंबिवली, वाराणसी, बडोदा आणि आग्रा या चार शहरांची निवड केली होती. अंतिम फेरीत बडोदा आणि आग्रा ही शहरे बाद ठरली. कल्याण- डोंबिवली व वाराणसी या दोन शहरांना कोरोना इन्होवेशन अवॉर्ड विभागून दिले.
-------------------
वाचली