सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी कोविड कर्मचाऱ्यांची ठाणे पालिकेवर धडक
By अजित मांडके | Published: November 8, 2023 01:06 PM2023-11-08T13:06:42+5:302023-11-08T13:08:53+5:30
महापालिकेच्या रुग्णालयातील १७५ कर्मचाऱ्यांनी केले बोनसच्या मागणीसाठी आंदोलन
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कोवीड काळात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आता ऐन दिवाळीच्या सुमारास संपाची हाक दिली आहे. आज सुमारे ४४५ कर्मचारी या संपात सहभागी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पगारवाढ आणि सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीसाठी ही संपाची हाक देण्यात आल्याची माहिती संताप सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यातही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यातील १७५ कर्मचारी आहेत त्यांनी आज पालिके समोर मागणीसाठी आंदोलन केले.
ठाणे महापालिकेच्या मार्फत कोवीड काळात रुग्णालय व इतर ठिकाणी खाजगी स्वरुपात कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले होते. त्यांना वारंवार कामाच्या ठिकाणी तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जात आहे. सध्या देखील यातील ४४५ कर्मचारी कामावर रुजू आहेत. परंतु त्यांच्या पगारात अद्यापही वाढ झाली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
याशिवाय पालिकेतील इतर कर्मचाऱ्याना कंत्राटी स्वरुपातील कर्मचाऱ्यांना देखील सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य झाले आहे. मात्र आम्ही कोवीड काळात आणि आता जीवावर उदार होऊन काम करीत असतांनाही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे कर्मचाºयांचे म्हणने आहे. त्यातही रुग्णालयात काम करीत असतांना या कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क येत असल्याने कर्मचारी आजारी पडत आहेत. परंतु त्यांना भर पगारी रजा दिली जात नाही. त्यामुळे किमान दिवाळी गोड व्हावी अशी माफक अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र पालिकेने सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्याने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी महापालिका मुख्यालय जवळ या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.