रुग्णाला दिले कोविड कचऱ्याचेही बिल, रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 02:36 AM2020-08-07T02:36:39+5:302020-08-07T02:38:15+5:30

कल्याणमधील धक्कादायक प्रकार : शिवसेना नगरसेवकाची रुग्णालयावर धडक

Covid waste bill also paid to the patient | रुग्णाला दिले कोविड कचऱ्याचेही बिल, रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

रुग्णाला दिले कोविड कचऱ्याचेही बिल, रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट केली जात आहे. एका रुग्णालयाचा कोविड दर्जा महापालिकेने रद्द केल्याची घटना ताजी असताना एका खाजगी रुग्णालयातील महिला रुग्णाच्या बिलात पीपीई किटसह कोविड कचरा विल्हेवाटीचा खर्चही समाविष्ट करण्यात आला होता. तसेच बिल न भरल्याने तिला डिस्चार्ज दिला नव्हता. हा प्रकार कळताच पीपीई किट घालून शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड रुग्णालयात पोहोचले. महिला रुग्णाला उचलून त्यांनी घरी नेऊन सोडले. याप्रकरणी रुग्णालयाच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

कल्याण पूर्वेतील एका कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी पश्चिमेतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तिला १० दिवसांच्या उपचाराचे बिल देण्यात आले. त्यात पीपीई किटचे ५० हजार रुपये तसेच तिच्यापासून तयार झालेल्या जैववैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठीचा खर्च लावला आहे. त्यामुळे आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलामुळे तिच्या नातेवाइकांनी गायकवाड यांच्याकडे धाव घेतली. गायकवाड यांनी बिल पाहून पीपीई किट परिधान करत थेट रुग्णालय गाठले. रुग्णालय व्यवस्थापनाला त्यांनी याप्रकरणी जाब विचारला असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
महिलेस दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज दिला होता. मात्र, तिने बिल न भरल्याने तिला रुग्णालयातून सोडले नव्हते, असे त्यांनी सांगितले. गायकवाड यांनी थेट महिलेला वॉर्डमधून उचलून आणत तिच्या घरी सोडले. याप्रकरणी महापालिकेने संबंधित रुग्णालयाच्या विरोधात कारवाई करावी. तसेच याप्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही दाद मागितली जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
यासंदर्भात संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने या घटनेनंतर नरमाईची भूमिका घेतली आहे. संबंधित महिलेचे बिल कमी केल्याचे सांगितले आहे.

‘अशा रुग्णालयांवर कारवाई करा’
केडीएमसी हद्दीतील २६ कोविड रुग्णालयांनी त्यांचा कोविड कचरा मनपाच्या जैववैद्यकीय कचरा प्रकल्पास देणे बंधनकारक आहे. अनेक रुग्णालये हा कचरा देत नसल्याने महापालिकेने त्यांना दंड ठोठावला आहे.
महापालिकेस कचरा न देता दंडात्मक कारवाईस सामोरे जाणारी रुग्णालये अशा प्रकारे रुग्णांकडून कचरा विल्हेवाट लावण्यासाठी पैसा वसूल करत असतील आणि तो महापालिकेस देत नसतील, तर ही रुग्णांची लूट आहे.
त्यामुळे अशा रुग्णालयांविरोधात महापालिकेने अधिक कठोर कारवाई करावी, याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Covid waste bill also paid to the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.