भाजपा सरकारविरोधात उद्यापासून पालघरसह ठाण्यात माकपचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 08:10 PM2018-10-09T20:10:00+5:302018-10-09T20:12:03+5:30

सात तालुक्यांमध्ये माकपचं ठिय्या आंदोलन

cpi m calls for agitation against state and central bjp government | भाजपा सरकारविरोधात उद्यापासून पालघरसह ठाण्यात माकपचा ठिय्या

भाजपा सरकारविरोधात उद्यापासून पालघरसह ठाण्यात माकपचा ठिय्या

Next

ठाणे: उद्यापासून ठाणे-पालघरमधील सात तालुक्यांमध्ये भाजपा सरकारविरोधात माकपाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये 50 हजार लोक सहभागी होणार असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. हुतात्मा दिन आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय या संघटना सहभागी होणार आहेत.

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे बुलेट ट्रेन, एक्सप्रेस हायवे आणि नदीजोड सारखे प्रकल्प ताबडतोब रद्द करा, वनजमिनी, वरकस जमिनी, देवस्थान व गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा, जिल्ह्यातील धरणांचे पाणी स्थानिक जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी प्राधान्याने द्या; दुष्काळ, रेशन, रोजगार, शिक्षण, पेन्शन, वीज, आरोग्य, घरकुले, रस्ते, गावठाण विस्तार असे स्थानिक प्रश्न ताबडतोब सोडवा, या मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून मागण्या होईपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नसल्याचा पवित्रा माकपनं घेतला आहे. 

भाजपा सरकारच्या धोरणांमुळे प्रचंड प्रमाणात वाढलेले पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंचे जीवघेणे भाव; भयानक प्रमाणात वाढलेली बेरोजगारी, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा व कुपोषण; राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरुन होत असलेले आरोप, वशिलेबाज भांडवलशाही; देशात पेटवण्यात येत असलेले धर्मांधन्ध व जातपातवादी वातावरण या मुद्द्यांवरही आंदोलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रखर जनजागृती केली जाणार आहे.

या आंदोलनाचे ठिकठिकाणचे नेतृत्व पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते एल. बी. धनगर व माजी खासदार लहानू कोम, पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य बारक्या मांगात व किसन गुजर, पक्षाचे राज्य कमिटी सदस्य रतन बुधर, रडका कलांगडा, सुनील धानवा, किरण गहला, लहानी दौडा, विनोद निकोले व लक्ष्मण डोंबरे, पक्षाचे जिल्हा सचिवमंडळ सदस्य एडवर्ड वरठा, यशवंत घाटाळ, भारत वळंबा, सुदाम धिंडा व प्राची हातिवलेकर, तलासरी पंचायत समितीच्या सभापती सविता डावरे व उपसभापती वनशा दुमाडा, तलासरीच्या नगराध्यक्षा स्मिता वळवी व उपनगराध्यक्ष सुरेश भोये, पक्षाच्या जिल्हा व तालुका कमिट्याचे सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य आणि अनेक गावचे सरपंच व उपसरपंच हे करणार आहेत.
 

Web Title: cpi m calls for agitation against state and central bjp government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.