एटीएम क्लोनिंग करून साडेतीन लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:26 AM2017-10-10T02:26:51+5:302017-10-10T02:27:06+5:30
कळवा येथील विजया बँकेच्या एटीएम मशीनचे क्लोनिंग करून सुनील चौरसिया यांच्यासह १४ ग्राहकांच्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांतून तीन लाख ५७ हजार ९०० रुपये लुबाडल्याचा प्रकार
ठाणे : कळवा येथील विजया बँकेच्या एटीएम मशीनचे क्लोनिंग करून सुनील चौरसिया यांच्यासह १४ ग्राहकांच्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांतून तीन लाख ५७ हजार ९०० रुपये लुबाडल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मास्क लावून आणि डोक्यात टोपी घालून आलेल्या एका भामट्याने विजया बँकेच्या खारेगाव शाखेत खाते असलेल्या चौरसिया यांच्यासह इतर विविध बँकांच्या १३ खातेधारकांच्या खात्यातून कळव्याच्या विजया बँकेच्या खारेगाव येथील एटीएम सेंटरमधून पैसे काढल्याचा प्रकार ७ ते ९ सप्टेंबर रोजी घडला. १४ ग्राहकांच्या खात्यातून तीन लाख ५७ हजार ९०० रुपयांची रोकड एटीएम केंद्रातून काढली.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर विजया बँकेच्या खारेगाव शाखा तसेच १४ ग्राहकांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक प्रदीपकुमार नायक यांनी कळवा पोलीस ठाण्यात ७ आॅक्टोबर रोजी दाखल केली आहे. एटीएम सेंटरच्या मशीनला क्लोनिंग मशीन लावून या ग्राहकांच्या कार्डांचे स्कॅनिंग करून नंतर त्याआधारे बनावट एटीएमकार्ड बनवून या कार्डचा पुन्हा २ ते ६ आॅक्टोबर २०१७ दरम्यान पुणे, ठाणे आणि मुंबई परिसरातील एटीएम सेंटरमध्ये वापर केला.