रेल्वेसेवा विस्कळीत : कसारा घाटात दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:43 AM2019-09-07T00:43:55+5:302019-09-07T00:44:09+5:30
रेल्वेसेवा विस्कळीत : लांब पल्ल्यांच्या गाड्या खोळंबून राहिल्या
कसारा : कसारा घाटात शुक्रवारी दरड कोसळल्याने मुंबईकडे येणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला येणाºया रेल्वेमार्गावर दुपारी दोनच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. परिणामी मुंबईकडे येणारी कामायनी एक्स्प्रेससह अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी रेल्वे स्थानकात उभ्या होत्या. घटना घडल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत दरड हटवण्याचे काम सुरू केले. तब्बल एक तासाच्या अथक परिश्रमानंतर दरड हटवण्यास कर्मचाऱ्यांना यश आले.
दरम्यान, या वर्षी कसारा रेल्वे घाटात सतत दरड कोसळत असून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकरणी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाय योजना करत नसल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा प्रवासी संघटनेचे राजेश घनगाव यांनी दिला आहे.
दरम्यान, पाऊस पडला की या रेल्वेमार्गावरील सेवा नेहमीच विस्कळीत होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. याचा नोकरदारांना फटका बसतो.