पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांसाठी वेगवेगळे कक्ष निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 12:46 AM2020-08-08T00:46:47+5:302020-08-08T00:47:00+5:30
महापौरांची मागणी : ठामपा आयुक्तांना दिले पत्र
ठाणे : महाराष्ट्र शासनाने मार्चमध्ये शासन निर्णय जारी करून कोविड रुग्णालयांमध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांसाठी वेगवेगळे कक्ष निर्माण करून त्यांना वेगवेगळी प्रवेशद्वारे ठेवण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. यात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या आजारांपैकी तीव्र स्वरूपाचे रुग्ण कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तातडीने भरती करून नंतर त्यांची तपासणी करून निगेटिव्ह आढळल्यास त्यांना नॉन-कोविड हॉस्पिटलमध्ये हलवावे, असे स्पष्ट निर्देश आहेत. या निर्देशांचे पालन करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी पत्राद्वारे शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली.
मागील जवळजवळ पाच महिन्यांच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेमार्फत कोविड साथ नियंत्रण मोहीम सुरू आहे. या कालावधीत अनेक अत्यवस्थ रुग्णांना नॉन-कोविड रुग्णालयांमध्ये भरती होणे भाग पडले. उच्चभ्रू अथवा मध्यमवर्गीय रुग्णांच्या कुटुंबीयांनादेखील सुरुवातीच्या काळात हाती पैसा नसताना खाजगी रुग्णालयांमध्ये होणारा खर्च परवडणारा नव्हता. गरीब व गरजू रुग्णांना अस्वस्थतेमुळे भरती होणे गरजेचे असताना, कोविड रुग्णालयामध्ये फक्त पॉझिटिव्ह रुग्णांना अॅडमिट करत असल्यामुळे आणि अभावानेच उपलब्ध असलेल्या नॉन-कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्यामुळे बहुतांश रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना विविध समस्यांना सामोरे जाणे भाग पडले, हे वास्तवही त्यांनी आयुक्तांकडे उघड केले आहे.
आज सुदैवाने तत्काळ रिपोर्ट उपलब्ध होणारी अॅण्टीजेन टेस्ट उपलब्ध आहे. परंतु, अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा दोन दिवस आरटी-पीसीआर टेस्टच्या रिपोर्टसाठी थांबणे भाग पडते. कोविड आजारामध्ये एका दिवसात पेशंटची परिस्थिती खालावू शकते. अशा तºहेने टेस्टचा रिपोर्ट नसल्यामुळे पेशंटला अॅडमिट करून घेतले जात नाही. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना जीव धोक्यात घालून घरी राहणे भाग पडते, अशी खंतही त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
८४ टक्के रिकव्हरी रेटबद्दल महापौरांनी मानले आभार
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ८४ टक्क्यांवर आले असून ही नक्कीच ठाणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे. ठाण्यातील कोरोना आटोक्यात यावा, यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, लोकप्रतिनिधी व आपणासह आपल्या सर्व सहकाऱ्यांचे ठाणेकरांतर्फे अभिनंदन करून त्यांनी आभारही मानले आहेत.