बनावट सीडीसी तयार करणा:या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 08:23 PM2017-08-03T20:23:20+5:302017-08-03T20:23:20+5:30
ठाणे, दि. ३ - देशविदेशात शिपींग कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अनिवार्य असलेले सीडीसी (कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट) अर्थात निरंतर निर्वहन प्रमाणपत्र बनावट छापून, त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा ठाणो पोलिसांनी गुरूवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून बनावट प्रमाणपत्र तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सीडीसीसारखा महत्वपूर्ण दस्तावेज बनावट तयार करून तो काही उमेदवारांना विकण्यासाठी एक आरोपी नौपाडय़ातील बी कॅबीन भागात येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून डोंबिवलीतील कोळेगाव येथील अब्दुल्ला मनत्तुमपाडत हकीम, ठाण्यातील वागळे इस्टेटमधील विजयन गोपाल पिल्ले आणि मालाडमधील मालवण येथील अलीम मोहद्दीन मुसा यांना 2 ऑगस्ट रोजी नौपाडय़ातून अटक केली. आरोपींच्या चौकशीतून पोलिसांना या टोळीच्या कार्यपद्धतीची माहिती मिळाली. शिपींग कंपन्यांमध्ये जहाजावर नोकरी करू इच्छिणा:या वेगवेगळय़ा राज्यांमधील उमेदवारांना गळाशी लावून, त्यांचा बायोडाटा हे आरोपी रायगड जिल्ह्यातील पाली येथील प्रदीप उर्फ दिनेश शंकर रौधळ याच्याकडे पाठवायचे. उमेदवारांच्या बायोडाटाच्या आधारे दिनेश रौधळ सीडीसी तयार करायचा. हे सीडीसी साधारणत: एक लाख रुपयात विकले जायचे. दिनेश रौधळ हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून, खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला गुरुवारी अटक केली. त्याच्या घरझडतीमध्ये पोलिसांनी सीडीसी तयार करण्यासाठी लागणारे लॅपटॉप, कलर प्रिंटर, स्कॅनर, रबरी शिक्के आदी साहित्य हस्तगत केले. याशिवाय काही उमेदवारांचे बायोडाटा, पासपोर्ट आणि पनामा देशाचे बनावट सीडीसीदेखील पोलिसांनी हस्तगत केले. त्याच्याविरूद्ध कुर्ला आणि ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात अपहार आणि फसवणुकीचे गुन्हे यापूर्वी दाखल असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबिरसिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पोलीस सहआयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.