ठाण्यातील व़्यास क्रिएशन्सचा बालखजिना आता नांदेडमध्येही, विद्यार्थ्यांसाठी १०० बालवाचनालये सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 03:21 PM2017-12-20T15:21:33+5:302017-12-20T15:29:59+5:30
ठाण्यातील व्यास क्रिएशन्सने सुरू केलेला बालखजिना हा महाराष्ट्रातील निम्म्या जिल्ह्यांत पोहोचला आहे. नांदेडमध्येही हा बालखजिना पोहोचला असून एकाच वेळी त्या ठिकाणी १०० बालवाचनालये सुरू करण्यात आली आहे.
ठाणे: आजची पिढी वाचनसमृद्ध व्हावी, मोबाईल, इंटरनेटच्या महाजाळातून दूर करुन त्यांना ज्ञानाच्या व माहितीच्या वटवृक्षाची सावली मिळावी यासाठी ठाण्याच्या व्यास क्रिएशन्सने बालसाहित्याचा अनमोल २०० पुस्तकांचा खजिना बालकुमारांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. यासाठी वाचनालयांचा आधुनिक आविष्कार असलेल्या बालवाचनालयांची संकल्पना समाजात नव्याने रुजवली. हा खजिना संच जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावा यासाठी व्यास क्रिएशन्सने संपूर्ण महाराष्ट्राला घातलेली साद नांदेडमध्येही भावले. तेथील विद्यार्थ्यांसाठी या बालखजिन्यांची १०० बालवाचनालये सुरू करण्यात आली आहे.
आज शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा या बालवाचनालयाचा मुख्य हेतू.महाराष्ट्रातील जवळजवळ १०० साहित्यिकांनी या संचासाठी लेखन केले आहे. सहज सोपी पुस्तकांची भाषा आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला पुरक असा हा ज्ञानमनोरंजनाचा खजिना आहे. ‘वाचेल तो वाचेल’ या दृढनिश्चयातून ही बालवाचनालय चळवळ वाढावी या व्यास क्रिएशन्सच्या प्रयत्नांना आ. हेमंत पाटील यांची मोलाची साथ लाभली आणि त्यांच्या सहकार्यातून नांदेड येथे १०० बालवाचनालये सुरू करण्यात आली आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर वाचलेच पाहिजे, वाचनाने माणूस समृद्ध होतो. वाचन चळवळ हीच समाजाला सतत प्रगतीपथावर घेऊन जात असते. म्हणून सतत वाचन केले पाहिजे. तसेच, एक सामाजिक भान म्हणून गरजू रुग्णांसाठी आपण वेळोवेळी रक्तदानही केले पाहिजे अशा शब्दांत मार्गदर्शन केले. यावेळी १०० शाळा, त्या शाळेतील भाषेचे शिक्षक, मुख्यध्यापक, शेकडो मुले एकत्र आले होते. वेगवेगळ््या ठिकाणी बालवाचनालयाचे कसे प्रयोग होत आहेत आणि पुस्तकाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. या बालवाचनलयासंदर्भात तांत्रिक अडचणी असतील, प्रोत्साहन हवे असेल, काही सूचना हव्या असतील तर फोनवरुन वेळोवेळी सांगण्यात येणार असल्याचे आवाहन व्यास क्रिएशन्सने केले. या बालखजिन्यात चॉक्लेटपासून चंद्रापर्यंत सर्व विषयांची पुस्तके आहेत. यात रा. ग. जाधव, एकनाथ आव्हाड, डॉ. द. वि. कुलकर्णी, सुमन नवलकर, संजय भास्कर जोशी, विजया राजाध्यक्ष अशा अनेक लेखकांची पुस्तके या संचात आहे. या बालखजिन्याचा प्राथमिक, माध्यमिक विभागातील विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. आगामी वर्षभरात ज्या जिल्ह्यांत बालवाचनालये सुरू होतील तेथील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कोणती पुस्तके वाचली याबाबत स्पर्धा घेणार असल्याचे व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचणे हा या मागचा हेतू असल्याचे ते म्हणाले.