प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:49 AM2021-09-07T04:49:04+5:302021-09-07T04:49:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत असून वस्तुनिष्ठता सोडून समाजाचा बु्द्धिभेद करणाऱ्या वृत्तांकनापासून लोकांनी सावध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत असून वस्तुनिष्ठता सोडून समाजाचा बु्द्धिभेद करणाऱ्या वृत्तांकनापासून लोकांनी सावध राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी रविवारी ठाणे येथे व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा केंद्र आणि अनघा प्रकाशन यांच्यातर्फे आयोजित शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंगला हायस्कूल येथे विविध क्षेत्रातील शिक्षकांचा सत्कार आणि आठ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. खोट्या देशभक्तीचा ज्वर वाढवून वाढती महागाई, प्रचंड बेरोजगारी, कोविड अव्यवस्थापन, प्रदीर्घ काळ चाललेले शेतकरी आंदोलन या जळत्या वास्तवापासून भरकटविण्यासाठी प्रसारमाध्यमेही राज्यकर्त्यांना साथ देत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात ओंकार टिकले (संगीत), कविता पडवळ (आदिवासी कल्याण), राजेश सुभेदार (कामगार पाल्य विकास) आणि संभाजी सावंत (नाट्य शिक्षण) या लक्षवेधी शिक्षकांशी मनीषा चव्हाण यांनी संवाद साधला. आधुनिक तंत्रज्ञान शिकून घेतले नाही, तर संगीतात पुढे जाता येणार नाही, असे टिकले यांनी सांगितले. आदिवासी पाड्यावरच्या मुलींना फक्त शिक्षण न देता, मासिक शरीरधर्मापासून लैंगिक शिक्षण देणेही गरजेचे आहे, याकडे पडवळ यांनी लक्ष वेधले तर सुभेदार यांनी कामगार वस्तीतील मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वेगळ्या पद्धती वापराव्या लागतात, असे सांगितले. अभिनय हीसुद्धा शिकण्याची आणि पुन्हा पुन्हा उजळणी करण्याची गोष्ट आहे, हे अनेक लोकप्रिय मराठी नट-नट्या विसरले आहेत, असे परखड निरीक्षण सावंत यांनी मांडले.
पुस्तकांचे झाले प्रकाशन
संध्यासमयी (मुरलीधर नाले), ठोका म्हणे आता (डॉ. महेश केळुसकर), ओ अमेरिका (डॉ. अनंत देशमुख), देवभूमी (प्रकाश लेले), सर्वांसाठी शिक्षण (डॉ. रजनी परांजपे), लॉटरी (माधवी घारपुरे), सुगंध गमावलेला मोगरा (नायर-थेरगावकर), समुद्रातील वाळवंट (अनुवादित कथा-डॉ. वसुधा सहस्रबुद्धे) ही पुस्तके या वेळी प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे केंद्राचे सचिव अमोल नाले यांनी केले.