शिवसेना-भाजपाच्या श्रेयवादाने आयुक्त जात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:00 AM2018-03-29T01:00:14+5:302018-03-29T01:00:14+5:30

नवीन ठाणे स्टेशन, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि जलवाहतूक हे प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावण्याकरिता संजीव

With the credit of Shivsena-BJP credentials | शिवसेना-भाजपाच्या श्रेयवादाने आयुक्त जात्यात

शिवसेना-भाजपाच्या श्रेयवादाने आयुक्त जात्यात

Next

ठाणे : नवीन ठाणे स्टेशन, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि जलवाहतूक हे प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावण्याकरिता संजीव जयस्वाल हेच ठाणे महापालिका आयुक्तपदी राहावे, याकरिता खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असून वरचेवर आपल्या बदलीची भाषा करणाऱ्या जयस्वाल यांचीही हे प्रकल्प सुरू करून पदावरून दूर होण्याची इच्छा आहे. त्यामुळे महापौर मीनाक्षी शिंदे व आयुक्त जयस्वाल यांच्यातील सध्याच्या वादंगात पुन्हा पालकमंत्री मध्यस्थी करतील, असे संकेत प्राप्त होत आहेत.
महासभेच्या निमित्ताने सुरू झालेल्या महापौर आणि आयुक्त यांच्यातील वादावर येत्या दोन ते तीन दिवसांत पडदा पडण्याची चिन्हे आहेत. वरकरणी हा वाद महापौरांविरुद्ध आयुक्त, शिवसेनाविरुद्ध आयुक्त असा भासत असला, तरी प्रत्यक्षात हे ठाण्यात होऊ घातलेल्या कामांचे श्रेय घेण्यावरून शिवसेना-भाजपात सुरू असलेला वाद आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील, तसतसा हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपाला सर करायचा असेल, तर येथे होणाºया कामांचे श्रेय आपले असल्याचे भाजपाला लोकांच्या मनावर ठसवावे लागेल. आयुक्त हा सरकारचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे सत्ताधारी भाजपा कामांचे श्रेय शिवसेनेला मिळू नये, याकरिता आयुक्तांवर दबाव टाकत आहे, तर शिवसेना आयुक्तांना लक्ष्य करून भाजपाला कामांचे श्रेय मिळणार नाही, याकरिता धडपड करत आहे. प्रत्यक्षात ही कामे मार्गी लागेपर्यंत शिंदे यांना जयस्वाल यांची बदली होऊ नये, असे वाटत आहे. कारण, नवीन व्यक्ती पदावर आल्यास सुरू केलेल्या कामांची गती मंदावण्याची व कदाचित प्रस्तावित प्रकल्पांना फाटे फुटण्याची भीती शिंदे यांना वाटते.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यावर लागलीच आयुक्त आणि पालकमंत्री यांच्यात पुन्हा चर्चा होऊन या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात झालेल्या महासभेत रेंटलच्या घराच्या मुद्यावरून महापौरांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर, अधिकाºयांनी दुसºया दिवशीच्या महासभेला गैरहजर राहून याचा वचपा काढला होता. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर महापौरांनी थेट आयुक्तांवर तोफ डागल्याने आयुक्त उद्विग्न झाले. अगोदर भाजपाने तर आता शिवसेनेने आयुक्तांना खिंडीत गाठले आहे.

भाजपातील काही मंडळींनी आयुक्तांविरुद्ध सुरू केलेली मोहीम मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीनंतर थांबली, तर आता महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उचल खाल्ली. काही दिवसांपूर्वी महापौर शिंदे व आयुक्त यांच्यातील वादात पालकमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी केली होती. त्यामुळे महापौर असो की भाजपाचे नगरसेवकही, या वादात शिवसेना, भाजपाच्या नेत्यांकडून वापरली जाणारी प्यादी असून प्रत्यक्षात मूळ लढाई ही शिवसेना-भाजपातील श्रेयाची आहे. मागील दोन वर्षांपासून शहरात होत असलेल्या विविध विकासकामांंमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री शिंदे यांनी आयुक्तांचे तोंडभरून कौतुक केले आहे. असे असतानाही महापौरांनी केलेली टीका आयुक्तांच्या मनाला लागली आहे.

Web Title: With the credit of Shivsena-BJP credentials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.