ठेवीदारांच्या बनावट सहया करुन १९ लाखांचा अपहार: ठाण्याच्या पतसंस्थेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:09 PM2018-08-12T22:09:42+5:302018-08-12T22:19:18+5:30
ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेत ठेवलेली १९ लाख ३० हजारांची रक्कम घेण्यासाठी गेलेल्या रामचंद्र गुरव यांची रक्कम परस्पर सहया करुन व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खजिनदार दादासाहेब केसरे याला पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे: मुंबईतील रामचंद्र गुरव या खातेदाराने विश्वासाने ठेवलेल्या १९ लाख ३० हजारांच्या रकमेचा ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खजिनदार दादासाहेब केसरे (२७) याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
गुरव यांनी १७ एप्रिल २०१७ रोजी त्यांच्या स्वत:च्या त्यांची दोन्ही मुले, लहान भाऊ आणि त्याची पत्नी यांच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील बवत खात्यात धनादेशाद्वारे १९ लाख ३० हजारांची रक्कम जमा केली होती. ही रक्कम दुसऱ्याच दिवशी १८ एप्रिल रोजी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश नलावडे आणि खजिनदार दादासाहेब केसरे यांनी आपसात संगनमत करुन रामचंद्र गुरव यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, लहान भाऊ शंकर आणि त्याची पत्नी यांच्यापैकी कोणाचीही लेखी परवानगी किंवा संमतीपत्र न घेताच त्यांच्या बनावट सहया करुन त्यांच्या बचत खात्यातील रक्कमेची परस्पर एफडी केली. त्याच एफडीवर ठेवतारण कर्ज घेऊन ती रक्कम पुन्हा त्यांच्या बचत खात्यात जमा केली. आरोपी नलावडे आणि केसरे यांनी गुरव कुटूंबियांच्या बनावट स्वाक्षºया करुन १८ एप्रिल २०१७ ते १५ सप्टेंबर २०१७ या मुदतीमध्ये पैसे काढून त्यांची १९ लाख ३० हजारांची फसवणूक केली. सुरुवातील गुरव यांनी याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. याच तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये या अपहाराचा प्रकार उघड झाल्याने याप्रकरणी अपहार, फसवणूकीचा गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात ११ आॅगस्ट रोजी दाखल केला आहे. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केसरेला अटक करण्यात आली असून प्रकाशचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या बचत खात्यात ठेवलेली १९ लाख ३० हजारांची रक्कम काढण्यासाठी रामचंद्र गुरव पतसंस्थेत गेले होते. या पतसंस्थेतून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यांनी कंटाळून याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या चौकशीतून हा अपहार उघड झाला. आरोपी खजिनदाराला अटक झाली असून त्याचा साथीदार शाखा व्यवस्थापक प्रकाश नलावडे यालाही चौकशीनंतर अटक केली जाणार आहे.
सुलभा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे
/>