क्रिकेटवर सट्टा: अभिनेता अरबाज खान अडचणीत येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 09:01 PM2018-06-01T21:01:13+5:302018-06-01T21:01:13+5:30
क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता सलमानचा भाऊ अरबाज खान याचीही चौकशी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून केली जाणार आहे. याबाबत त्याला हजर होण्याची नोटीस ठाणे पोलिसांनी बजावली आहे.
ठाणे: ‘आयपीएल’ क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१, रा. मालाड, मुंबई) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्यानंतर आता अभिनेता सलमान खानचा मोठा भाऊ अरबाज खान याचीही चौकशी केली जाणार आहे. सोनूकडे मिळालेल्या काही माहितीच्या आधारे त्याला ठाणे पोलिसांनी शनिवारी हजर होण्याची नोटिस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जलाल याच्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला. त्यात तो आतापर्यंत दोन कोटी ८० लाख रुपये हारला. काही दिवस त्याने पैसे दिले. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी अरबाजकडे जलालने तगादा लावला होता. त्यासाठी वारंवार त्यांचे फोनवरून आणि मध्यस्थांमार्फत बोलणेही झाले. पण अरबाज त्याला प्रतिसाद देत नव्हता. त्यातूनच त्याला जलालने धमक्या दिल्या होत्या. सोशल मिडियातून अरबाज आणि जलाल यांचे फोटोही व्हायरल झाले होते. जलालच्या मोबाईलमध्येही काही बुकी तसेच अरबाजचे फोटो जलालसमवेत मिळाले. तिच्याच आधारे ठाण्याचे खंडणी विरोधी पथक आता अरबाजकडे चौकशी करणार आहे. त्याने नेमकी किती पैशांचा सट्टा लावला? त्यातील किती पैसे देणे बाकी आहेत? या सर्व बाबींची त्याच्याकडे चौकशी करण्यासाठीच त्याला २ जून रोजी खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटिस बजावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले.
क्रिकेटवर सट्टा लावणारे देशभरातील ९८ सट्टेबाज जलालच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाच्या चौकशीत उघड झाली होती. २७ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध हैद्राबाद सुपरकिंग्ज असा सामना रंगला होता. याच शेवटच्या सामन्यावर सट्टा लावण्यासाठी देशभरातील ९८ बुकी हे जलालच्या संपर्कात होते. हीच माहिती त्याच्याच साथीदारांकडून उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला २९ मे रोजी अटक केली.