कल्याण-डोंबिवलीत १०० जणांविरोधात गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 03:25 AM2019-04-04T03:25:03+5:302019-04-04T03:25:19+5:30
कोम्बिंग आॅपरेशन : निवडणुकीमुळे कारवाई
कल्याण : लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी कल्याण आणि डोंबिवली शहरांत मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत कोम्बिंग आॅपरेशन राबवले. या कारवाईत सुमारे १०० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठाणे पोलीस आयुक्त आणि पोलीस सहआयुक्त यांच्या सूचनांनुसार हे आॅपरेशन राबवण्यात आले. कल्याण रेल्वेस्थानक परिसर, जोकर टॉकीज, आंबिवली, अटाळी, पिसवली या भागांत मंगळवारी रात्री ११ ते बुधवारी सकाळी ५ पर्यंत हे आॅपरेशन सुरू होते. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी असे १२८ कर्मचारी तसेच मोबाइल शोध पथक, दरोडा प्रतिबंधक पथक यांनी मिळून ही गुन्हेगार शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत पथकाने १० हिस्ट्रीशिटर, सात रेकॉर्डवरील गुन्हेगारांबरोबरच २५ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. तसेच चार आर्म अॅक्ट कारवाई, आठ एनडीपीएस, तीन दारूबंदी आणि जुगार यासारख्या कारवाईत सुमारे १०० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी विविध ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली होती.