राजस्थानच्या औषधांची बाजारात खुल्याने विक्री केल्याप्रकरणी 12 वितरकांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:52 PM2018-08-28T22:52:25+5:302018-08-28T23:05:35+5:30
राजस्थान सरकारच्या रुग्णालयांसाठी खरेदी केलेल्या महागड्या औषधाची चक्क मीरा-भार्इंदरसह मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याप्रकरणी भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात १२ औषध वितरकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
- धीरज परब
मीरा रोड - राजस्थान सरकारच्या रुग्णालयांसाठी खरेदी केलेल्या महागड्या औषधाची चक्क मीरा-भार्इंदरसह मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याप्रकरणी भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात १२ औषध वितरकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु राजस्थान सरकारशी संबंधित हा प्रकार असताना व काही राज्यांमध्ये औषधांची विक्री केल्याचे उघड झाले असताना नवी मुंबईच्या अन्न व औषध प्रशासनाने भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राजस्थान सरकारच्या रुग्णालयांमध्ये व्हायरल इन्फेक्शन झालेल्या गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महाग असलेले इम्युनो आरईएल हे औषध नवी मुंबईतील रबाळे येथे असलेल्या रिलायन्स लाईफ सायन्सकडून घेतले जाते. सदर औषधावर राजस्थान सरकार व विक्रीसाठी नाही असा शिक्का असतो. परंतु राजस्थान सरकारसाठी पुरवण्यात आलेल्या या महागड्या औषधांवरील शिक्क्यावर किरकोळ विक्री किमतीचे लेबल लाऊन ते खुल्या बाजारात विकले जात असल्याची माहिती रिलायन्स कंपनीला समजल्यावर त्यांनी नवी मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनाकडे याची तक्रार केली होती.
अन्न व औषध प्रशासनाने सदर तक्रारप्रकरणी चौकशी केली असता सदर औषध विक्रेत्यांना पुरवणारे भार्इंदर येथील मेडिकॉन लाईफ केअर सह मीरारोड येथील आणखी श्रीगुरुफार्मा एका वितरकाचे नाव समोर आले. दरम्यान भार्इंदरच्या वितरकाकडून औषधाच्या ४५ वायल सापडल्या. या शिवाय परळ, सुरत, कोलकत्ता, ग्वाल्हेर, इंदूर, गुजरात आदी भागातील वितरकांकडून सुद्धा काही प्रमाणात सदर औषधं सापडली आहेत.
नवी मुंबईच्या निरीक्षक सपना घुनिकर यांच्या फिर्यादीनंतर शुक्रवारी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भार्इंदरच्या वितरकाने सदर औषध इंदूर येथील वितरकाकडून आणल्याचे व तशी पक्की बिलं त्याने पोलिसांना सादर केली आहेत. अन्य वितरकांनी देखील रितसर औषधं खरेदी केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
मुळात राजस्थान सरकारला पुरवठा केलेली सदर औषधं काळ्या बाजारात विक्री केली जात असताना त्याची पाळंमुळं राजस्थानमधूनच फोफावली असल्याची शक्यता आहे. नेमकी कुठून व किती प्रमाणात सरकारी औषधं काळ्या बाजारात विकली गेली याचा सखोल तपास करण्यासाठी राजस्थान सरकार वा महाराष्ट्र सरकारला कळवून विशेष पथकं तयार करणं गरजेचं होतं. परंतु तसं काही न करता घाईगडबडीत अन्न व औषध प्रशासनाने नवघर पोलिसात केलेल्या फिर्यादीनंतर आता नवघर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे, असं जाणकारांचं मत आहे.
उपनिरीक्षक विजय टक्के यांच्याकडे तपास सोपवण्यात आला असून, अद्याप कोणाला अटक केलेली नाही. या प्रकरणी मीरा-भार्इंदर सह अन्य राज्यात जाऊन नवघर पोलिसांना हा तपास करावा लागणार आहे. पण इतक्या गंभीर व अन्य राज्यात याचे धागेदोरे असणा-या या गुन्ह्याप्रकरणी एकूणच सखोल चौकशीची आवश्यकता असताना अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे.