ठाण्यात शिवसेनेकडून भाजपच्या १७ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा, शिवसेना-भाजप संघर्ष चिघळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 09:12 AM2021-03-20T09:12:50+5:302021-03-20T09:13:35+5:30
डुंबरे यांच्या दालनात घुसून निदर्शने व घोषणाबाजी केल्याबद्दल शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह ४० पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अलीकडेच भाजपने गुन्हा दाखल केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली गेली आहे.
ठाणे: कोरोनाचा प्रकोप सुरू असताना नोव्हेंबर २०२० मध्ये ऑनलाइन महासभेच्या वेळी सभागृहाबाहेर जमाव जमवून ऑफलाइन महासभा घेण्याच्या मागणीकरिता घोषणाबाजी केल्याबद्दल भाजपच्या १७ नगरसेवकांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी पादचारी पुलांच्या उभारणीवरून शिवसेनेवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांकरिता शिवसेनेने त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला आहे. डुंबरे यांच्या दालनात घुसून निदर्शने व घोषणाबाजी केल्याबद्दल शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह ४० पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अलीकडेच भाजपने गुन्हा दाखल केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली गेली आहे.
भाजपच्या ज्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्यामध्ये गटनेते डुंबरे, संदीप लेले, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मनेरा, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, नंदा पाटील, आशा शेरबहादूर सिंह, नारायण पवार, स्नेहा आंब्रे, दीपा गावंड, अशोक राऊळ यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (३), १३५ प्रमाणे तसेच भादंविच्या कलम १८८ कलमान्वये आणि साथरोग कायद्याच्या कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर डुंबरे यांच्याविरोधात शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपने शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह ४० पदाधिकाऱ्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात १८८ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता शिवसेनेनेही भाजपच्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २० ऑक्टोबर रोजी झालेल्या ऑनलाइन महासभेच्या वेळेस ही महासभा ऑफलाइन घ्यावी, या मागणीसाठी नरेंद्र बल्लाळ सभागृहाबाहेर एकत्र येऊन हातात फलक घेऊन घोषणाबाजी करून आंदोलन केले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महासभेतही अशाच पद्धतीने त्यांनी थेट नरेंद्र बल्लाळ सभागृहात आंदोलन केले होते, असे तक्रारीत नमूद केले आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये कोरोनाची परिस्थिती असल्याने गर्दी करू नये, जमाव करू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आदेश असतानाही या नगरसेवकांनी त्याचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हे सुडाचे राजकारण आहे. आम्ही ज्यावेळेस हे आंदोलन केले होते, तेव्हा कोरोनाचे रुग्ण कमी आढळत होते, त्यामुळे नियमात शिथिलता लागू केली होती. त्यावेळी इतर कार्यक्रमांना २०० ते ३०० लोक जमत होते. परंतु, आताची परिस्थिती वेगळी आहे. नोव्हेंबरमध्ये केलेल्या निदर्शनांकरिता आता तक्रार करणे अयोग्य आहे. आतापर्यंत सत्ताधारी शिवसेना झोपली होती का? अब्रुनुकसानीच्या दाव्याला आम्ही न्यायालयात उत्तर देऊ.
- मनोहर डुंबरे, गटनेते, भाजप