अपसंपदा बाळगल्याप्रकरणी ठाण्यातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्यासह 19 जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:09 PM2018-04-05T22:09:15+5:302018-04-06T04:25:46+5:30
बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चव्हाण यांनी अधिकृत स्त्रोतापेक्षा ४१ टक्के जादा मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांच्यासह 19 जणांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी ही कारवाई केली.
ठाणे - बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील एक आरोपी ठाणे महापालिकेतील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी ज्ञात स्त्रोतापेक्षा सुमारे ४१ टक्के जादा संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुरुवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची पत्नी, सासू, सासरे अशा 19 जणांविरुद्ध त्यांना मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
बिल्डर सूरज परमार यांची ७ आॅक्टोंबर २०१५ रोजी आत्महत्या झाली होती. याप्रकरणी तत्कालीन नगरसेवक सुधाकर चव्हाण, काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण, राष्टÑवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि ठामपातील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात या चौघांविरुद्ध आरोपपत्रही दाखल झाले आहे. त्यानंतर याप्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या सहायक पोलीस आयुक्त अविनाश मोहिते यांच्यासह १६ जणांच्या पथकाने गुरुवारी दिवसभर वेगवेगळया ठिकाणी धाडसत्र राबवून हा गुन्हा दाखल केला. नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याविरुद्ध यापूर्वीच अपसंपदा बाळगल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एप्रिल १९९२ ते आॅक्टोंबर २०१५ या नगरसेवक पदाच्या कालावधीत सुधाकर चव्हाण यांनी दहा कोटी ९६ लाख ५१ हजार ५०२ रुपये इतकी अधिकृत उत्पन्नापेक्षा ४१ टक्के जादा अपसंपदा बाळगल्याचा आरोप आहे. यामध्ये त्यांना सहाय्य करणारी त्यांची पत्नी सुलेखा सुधाकर चव्हाण, सासू मनोरमा शिवाजी सूर्यवंशी, सासरे शिवाजी सूर्यवंशी, मेव्हणा विलास शिवाजी सूर्यवंशी, संगीता विलास सूर्यवंशी (मेव्हण्याची पत्नी) आदी 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर चव्हाण यांच्या शिवाईनगर येथील मंत्रांजली बंगला, मीरा रोड आणि नरीमन पाँर्इंट येथील वेगवेगळया ठिकाणी पोलिसांनी धाडसत्र राबविले.