उल्हासनगरात दोन बिल्डर्ससह वास्तुविशारद यांच्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:43 AM2021-08-23T04:43:02+5:302021-08-23T04:43:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : जोखीम आधारित परवान्याअंतर्गत अवैध बांधकाम केल्याप्रकरणी दोन बिल्डर्ससह वास्तुविशारद अशा तीन जणांवर उल्हासनगर पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : जोखीम आधारित परवान्याअंतर्गत अवैध बांधकाम केल्याप्रकरणी दोन बिल्डर्ससह वास्तुविशारद अशा तीन जणांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्या आदेशानुसार अभियंता दीपक ढोले यांनी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात १८ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर अवैध बांधकामाबाबत प्रसिद्ध असून, शेकडो अवैध बांधकामे आजही सर्रासपणे उभी राहत आहेत. दरम्यान, महापालिका नगररचनाकार विभागाकडून शेकडो जोखीम आधारित बांधकाम परवाने तीन वर्षांपूर्वी देण्यात आले. जोखीम आधारित बांधकाम परवानाअंतर्गत सर्रासपणे अवैध बांधकामे झाली. या बांधकामाची चर्चा झाल्यावर तत्कालीन आयुक्त व नगररचनाकार यांनी चौकशीचे आदेश दिले. मात्र चौकशीचे काय झाले, याबाबत तर्कवितर्क केले जात आहे. प्रकाश कुकरेजा यांनी चेलाराम मार्केट येथील जोखीम आधारित परवान्यांअंतर्गत अवैध बांधकाम झाले, अशी तक्रार केली होती. चौकशीअंती नगररचनाकार विभागाने, सदर बांधकाम अवैध ठरविले. नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्या आदेशानुसार अभियंता दीपक ढोले यांनी दि. १८ ऑगस्ट रोजी बांधकामाचे बिल्डर हरेश लालवानी, राजेश खानवानी व वास्तुविशारद स्वप्नील जाधव यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
उल्हासनगर पोलिसांनी दोन बिल्डर व वास्तुविशारद अशा तिघांवर जोखीम आधारित बांधकाम परवान्यांतर्गत अवैध बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. याप्रकाराने जोखीम आधारित बांधकाम परवान्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. तसेच शहरात सर्रासपणे आरसीसीचे शेकडो बांधकामे विनापरवाना होत असल्याने, महापालिकेचा लाखो रुपयांचे उत्पन्न बुडीत निघाले आहे. गेल्या आठवड्यात अवैध बांधकामांवर पाडकाम कारवाई करून कारवाईचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर कारवाई थंड पडल्याने, महापालिका अतिक्रमण विभागावर टीकेची झोड उठली.