औषध निर्मिती शिक्षणाच्या बनावट पदव्या देणाऱ्या अधिष्ठातासह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 09:22 PM2019-07-09T21:22:39+5:302019-07-09T21:27:51+5:30
बी आणि डी फार्मसीचे बनावट पदव्या देऊन प्रवेशाच्या नावाखाली एका विद्यार्थ्याची दोन लाख ६७ हजार ४०० रुपयांची रक्कम उकळणारा अधिष्ठाता पुरुषोत्तम तहीलरामानी आणि इतर संचालक मंडळाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. औषध निर्माणीसारख्या क्षेत्रात बनावट प्रमाणपत्रांचा वापर करुन रुग्णांच्या जीवाशी खेळणाºया या टोळीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ठाणे: वेगवेगळया विद्यापिठाच्या नावाखाली प्रवेश दाखवून बी आणि डी फार्मसीचे बनावट पदव्या देऊन प्रवेशाच्या नावाखाली एका विद्यार्थ्याची दोन लाख ६७ हजार ४०० रुपयांची रक्कम उकळणारा अधिष्ठाता पुरुषोत्तम तहीलरामानी आणि इतर संचालक मंडळाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बनावट डी-फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे बिनधास्तपणे औषध विक्रीचा व्यवसाय करणा-या दुकानदार आणि त्यांना बनावट प्रमाणपत्रे देणा-या १७ जणांच्या टोळीला यापूर्वीच ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.
कोलशेत येथील डिपोओझ नेट कॉलेजला डी आणि बी फार्मसी कॉलेजचे प्रशिक्षण घेण्याबाबतची कोणतीही अधिकृत मान्यता नव्हती. तरीही २०१६ पासून ते ८ जुलै २०१९ या तीन वर्षांच्या काळात राजस्थानचे ओपीजीएस विद्यापीठ आणि इतर विद्यापिठांच्या नावाने प्रवेश दाखवून ठाण्याच्या कोलशेत रोड मनोरमानगर येथील रहिवाशी असलेल्या उमाकांत यादव (२१) या तरुणाकडून दोन लाख ६७ हजार ४०० रुपयांची रोकड घेण्यात आली. याशिवाय, इतरही सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क घेऊन त्यांना बनावट गुणपत्रिका देऊन त्यांची फसवणूक केली. हा प्रकार उघड होताच याप्रकरणी नेट कॉलेजचे अधिष्ठाता पुरुषात्तम तहिलरामानी तसेच इतर संचालक मंडळाविरुद्ध ८ जुलै २०१९ रोजी फसवणूक आणि बनावट प्रमाणपत्र बनविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहीलरामानी याच्यासह १७ जणांना यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने यापूर्वीच फसवणूकीच्या अन्य एका प्रकरणात गुन्हा दाखल करुन अटक केली होती. या प्रकरणात त्याची जामीनावर सुटका झाली आहे. त्याला आता या गुन्हयातही लवकरच अटक केली जाणार असल्याचे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.