कल्याणमध्ये चार डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:56 AM2020-10-03T00:56:05+5:302020-10-03T00:56:37+5:30
खोट्या सही, शिक्क्यानिशी दिले मृत्यू दाखले : कोळसेवाडी पोलिसांकडून तपास सुरू
कल्याण : एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या नावाचा सही, शिक्का तयार करून त्याचा गैरवापर करत रुग्णांच्या नातेवाइकांना मृत्यू दाखले दिले जात होते. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पूर्वेतील एका खाजगी रुग्णालयातील चार डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. अरुण चंदेल (रा. नेतिवली) हे उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात कार्यरत आहेत. २०१७ पूर्वी ते कल्याण पूर्वेतील साई स्वस्तिक या खाजगी रुग्णालयात रुग्ण तपासणीसाठी येत असत. मात्र, २०१७ नंतर त्यांनी त्या रुग्णालयात व्हिझिट देणे बंद केले आहे. परंतु, त्या रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृत्यू दाखला देताना चंदेल यांच्या नावाचा सही, शिक्का वापरण्यात येत होता. एका पोलिसाचे वडील कोविडमुळे मृत्युमुखी पडले. त्यांच्या वडिलांच्या मृत्यू दाखल्यावर चंदेल यांचा सही, शिक्का होता. चर्चेतून ही गोष्ट चंदेल यांच्या कानांवर गेली. त्यांनी तर २०१७ पूर्वीच व्हिझिट देणे बंद केलेले असताना स्वस्तिक रुग्णालयात त्यांच्या नावाचा गैरवापर करून मृत्यूचे दाखले दिले जात
आहेत. या प्रकारामुळे त्यांच्यासह रुग्णांच्या नातेवाइकांची फसवणूक केली जात होती.
आतापर्यंत किती मृत्यू दाखले दिले?
मृत्यूचा दाखला एमडी मेडिसिन वैद्यकीय शैक्षणिक पात्रता असलेल्या डॉक्टरलाच देता येतो. त्यामुळे चंदेल यांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसात तक्रार दिली.
त्यानुसार फसवणूक केल्याच्या आरोपाखाली स्वस्तिक रुग्णालयातील डॉ. स्वप्नील मुंडे, तुषार टेंगणे, सतीश गीते आणि आर.एम. जैस्वाल या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जानेवारी २०१७ ते तक्रार दाखल होईपर्यंत किती रुग्णांचे मृत्यू दाखले दिले गेले आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे.