शिविगाळ केल्याप्रकरणी नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:42 AM2021-05-21T04:42:31+5:302021-05-21T04:42:31+5:30
मीरा रोड : भाईंदर पश्चिमेच्या महेशनगर - २ या इमारतीच्या सामूहिक बाल्कनीचा भाग मंगळवारी पहाटे कोसळल्यानंतर धोकादायक असलेली ही ...
मीरा रोड : भाईंदर पश्चिमेच्या महेशनगर - २ या इमारतीच्या सामूहिक बाल्कनीचा भाग मंगळवारी पहाटे कोसळल्यानंतर धोकादायक असलेली ही संपूर्ण इमारतच पालिकेने तोडण्याचे काम हाती घेतले आहे. त्यावेळी पालिकेच्या कामात अडथळा आणून अधिकाऱ्यास धक्काबुक्की व शिविगाळ केल्याने भाजप नगरसेविकेच्या पतीसह चार जणांवर पालिकेने भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे व जवानांनी इमारतीत अडकलेल्या ७२ जणांना आधीच बाहेर काढले. त्यानंतर त्यांचे महत्त्वाचे सामान तेवढे काढून देण्यात आले. परंतु अग्निशमन दलाच्या लोखंडी जिन्यावरून बहुतांश सामान खाली उतरवणे अशक्य होते. त्यातच जिन्यातून जाताच येत नसल्याने आणि इमारत वा त्याचा भाग पडण्याची भीती असल्याने पालिकेने इमारत पाडण्यास घेतली. मात्र, रहिवासी हर्ष शाह यांनी खोलीतील महत्त्वाची कागदपत्रे व सोन्याचे दागिने असल्याने ते आणू द्या, असा आग्रह धरला. हर्ष हा दागिने व कागदपत्रे घेऊन येतो सांगून अग्निशमन दलाच्या शिडीने खोलीत गेला तो परत आलाच नाही. जवानांनी वर जाऊन पाहिले असता हर्ष छताचा पंखा काढत होता. त्यावरून अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी सुनावले असता नगरसेविकेचा पती सतीश भूपतानीसह हर्ष, आर्यन उन्मेष शाह (२०), मीत उन्मेष शाह (२१) व उन्मेष जसवंतलाल शाह (५०) यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात अडथळा आणून अधिकारी यांना धक्काबुक्की, शिविगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.