ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 07:44 PM2019-07-18T19:44:59+5:302019-07-18T19:49:14+5:30
दुसरे लग्न केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सासू सासऱ्यांसह पतीविरुद्ध मानसिक आणि शारिरिक छळवणूकीची तक्रार दाखल करणा-या महिलेने बुधवारी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
ठाणे: सासू सासरे आपल्या पतीला भेटून देत नाहीत. त्यामुळे मला जगायचे नाही, असे म्हणत थेट ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न करणा-या प्रिती त्रिदेव केणे (२४, रा. आंंबिवली, ठाणे) या महिलेविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.
रिक्षा चालक असलेल्या त्रिदेव केणे (३०, रा. खडवली) याच्या बरोबर प्रितीचे सहा महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न झाले आहे. या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. घरातील कौटुंबिक वादातून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. यातूनच तिने पती आणि सासू सासºयांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात ४९८ ची तक्रार दाखल केली आहे. याच प्रकरणामध्ये पतीचे नाव वगळावे. केवळ सासू सासºयांचे नाव फिर्यादीमध्ये ठेवण्यात यावे, अशीही तिची मागणी आहे. माझे सासू सासरे हे पती त्रिदेव याला घेऊन गेले आहेत. त्याला भेटू देत नाहीत. त्यामुळे मला जगायचे नाही, असे म्हणत तिने १७ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हातातील काचेच्या तुकडयाने स्वत:च्या पोटावर वार करुन दुखापत करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. वैफल्यग्रस्त असल्याने तिने हा प्रकार केल्याची शक्यता असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.