मीरा - भार्इंदर पालिका उपायुक्तांविरोधात गुन्हा
By admin | Published: June 27, 2017 03:07 AM2017-06-27T03:07:40+5:302017-06-27T03:07:40+5:30
मुर्धा खाडीतील कांदळवनाची तोड तसेच सरकारचा कांदळवन सेल व मनपाने संगनमताने खोटा पंचनामा बनवून उच्च न्यायालयाची
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मुर्धा खाडीतील कांदळवनाची तोड तसेच सरकारचा कांदळवन सेल व मनपाने संगनमताने खोटा पंचनामा बनवून उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने उघडकीस आणला. नालेसफाईच्या नावाखाली मुर्धा किनाऱ्यावरील कांदळवनाच्या सव्वाशे झाडांची कत्तल केल्याप्रकरणी अखेर मीरा- भार्इंदरचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टेंसह ६ ते ८ जणांविरोधात तहसीलदारांच्या निर्देशाने भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मीरा- भार्इंदर महापालिकेने शहरातील खाडी वा उपखाड्या या चक्क नाले असल्याची दिशाभूल करत एकूण १२ नाल्यांमधील २ लाख ८४ हजार चौ.मी. भागातील कांदळवनाची झाडे काढण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. कांदळवन सेल व आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच दि बॉम्बे एन्वायरमेंट अॅक्शन ग्रूपच्या प्रतिनिधींनी अहवाल मागवला होता. मुर्धा खाडी, जाफरी खाडी, कनकिया, नवघर खाडी, घोडबंदर खाडी, भार्इंदर पश्चिम खाडीची पाहणी केली असता पाण्याचा प्रवाह सुरळीत असल्याचे तसेच खाडी व परिसरात कचरा, बेकायदा भराव झाल्याचे आढळले.
महापालिकेने न्यायालयास केवळ झाडांची छाटणी केल्याचे सांगितले. तर कांदळवन सेलने फक्त ७ ते ८ झाडेच कापल्याचा पंचनामा पालिकेच्या संगनमताने बनवला. परंतु महसूलने पाहणी केली असता कांदळवनाची लहान-मोठी १२२ झाडे कापलेली आढळली. त्या आधारे तहसीलदार किसन भदाणे यांच्या आदेशाअंती मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची फिर्याद दिली.
उपायुक्त डॉ. पानपट्टेंसह विधी अधिकारी सई वडके यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना, आम्हाला उच्च न्यायालयाने झाडे काढायची परवानगी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी पालिकेला पत्र दिले असता त्यात झाडे कापायला किंवा तोडायला परवानगी दिल्याचे नमूदच नव्हते.