जप्त हातगाडी सोडवण्यासाठी लाच घेणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यासह सुरक्षारक्षकांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 09:24 PM2020-02-26T21:24:45+5:302020-02-26T21:25:08+5:30
भाईंदर पूर्वेला बुर्जीपावची गाडी लावणाऱ्या एका चालकाची गाडी पालिकेने कारवाई वेळी जप्त करून भाईंदर पश्चिमेस उड्डाणपुलाचे खाली गोदामात जमा केली होती.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेली बुर्जीपाव ची गाडी परत करण्यासाठी गाडी चालका कडे दिड हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यासह पालिका ठेकेदाराच्या सुरक्षारक्षकांविरुद्ध ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर पूर्वेला बुर्जीपावची गाडी लावणाऱ्या एका चालकाची गाडी पालिकेने कारवाई वेळी जप्त करून भाईंदर पश्चिमेस उड्डाणपुलाचे खाली गोदामात जमा केली होती. सदर गाडी परत पाहिजे असेल तर 2 हजार लाचेची मागणी भाईंदर पूर्व फेरीवाला पथकातील उज्वल संख्ये या पालिका कर्मचाऱ्याने केली होती. त्याची तक्रार चालकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
पोलिसांनी तक्रारीची खात्री केल्यावर 25 फेब्रुवारी रोजी सापळा रचून संख्ये याच्या सांगण्या वरून सैनिक सिक्युरिटीचा ठेकेदारी वरील सुरक्षा रक्षक असलेल्या रंजन मोतीराम राऊत ( 42 ) याने चालका कडून दिड हजार रुपये स्वीकारले. सदर लाचेची रक्कम घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सुरक्षा रक्षक राऊत याला रंगेहाथ अटक केली, तर संख्ये याचा शोध सुरु आहे.