संच्युरी रेयॉन कंपनीच्या प्रशासनासह टँकर चालक-मालकावर गुन्हा
By सदानंद नाईक | Published: September 24, 2023 08:24 PM2023-09-24T20:24:37+5:302023-09-24T20:25:28+5:30
संच्युरी कंपनीतील टँकर स्फोट प्रकरणी
सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील संच्युरी रेयॉन कंपनीतील टँकर स्फोट प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात संच्युरी कंपनीचे प्रशासन तसेच स्फोट झालेल्या टँकर चालक-मालकावर सुरक्षितेच्या उपाययोजनेकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फुलपगारे अधिक चौकशी करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड गावठाण परिसरात असलेली संच्युरी रेयॉन कंपनीत सकाळी साडे अकरा वाजाता गुजरात वरून आलेला नायट्रोजनच्या टँकर मध्ये कार्बनडाय सल्फर लिक्विड भरताना टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. नायट्रोजन टँकर चालक मालकांनी कोणतीही काळजी न घेता टँकर मध्ये कार्बनडाय सल्फर लिक्विड भरण्यासाठी आणले. तसेच कंपनी प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टँकरची कोणतीही तपासणी न करता कार्बनडाय सल्फर भरण्याचा प्रयत्न करीत असतांना स्फोट झाला. यामध्ये टँकरवरील चालक पवनकुमार राजेंद्र यादव-आसरे, कंपनीचे फिल्टर शैलेश राजकारण यादव, राजेश जीवनलाल श्रीवास्तव व हेल्पर कामगार असलेला अनंता नामदेव डिंगोरे यांचा जागीच मृत्यू झाला. टँकरचा स्फोट एवढा भयानक होता की, शहाड गावठाण परिसरात हादरे बसले. तर मृत्यू झालेल्या कामगारांच्या देहाचे तुकडे सर्वत्र उडाले होते.
उल्हासनगर पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे, सहायक पोलीस आयुक्त अजय कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिलेली माहिती व संच्युरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिलेल्या माहितीत प्रचंड तफावत होती. मृत्यू व जखमींची संख्येबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. कंपनीकडून शेवट पर्यंत २ जणांचा मृत्यू तर २ जण मिसिंग व ४ जण जखमी झाल्याची माहिती देऊन, कंपनीच्या आत प्रवेश करण्यास सर्वांना मनाई केली होती. राष्ट्रवादीचे युवानेते व आमदार रोहित पवार, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह स्थानिक नेत्यांना कंपनी दुर्घटनास्थळी जाण्यास मनाई केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
कामगारांच्या तुकड्याचे शवविच्छेदन?
संच्युरी कंपनीतील स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचे तुकडे झाले होते. मध्यवर्ती रुग्णालयात कामगारांच्या शरीराच्या तुकड्याचे शवविच्छेदन करण्यात आले. कामगारांच्या शरीराचे तुकडे झाल्याने, त्यांची ओळख पटविण्यात कंपनी प्रशासनाचा व पोलिसांचा वेळ गेल्याचे समजते. तसेच स्फोटाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कंपनी प्रशासनाच्या वतीने जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली आहे.