साबणाच्या नावाने दारूची तस्करी करणाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:56+5:302021-07-25T04:33:56+5:30
मुंब्रा : येथील वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लिक्विड सोपच्या नावाने होणारी दारूची तस्करी उघडकीस आणली ...
मुंब्रा : येथील वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लिक्विड सोपच्या नावाने होणारी दारूची तस्करी उघडकीस आणली आहे. मुंब्रा बायपासमार्गे गोव्याहून गुजरातला चाललेला एक ट्रक गुरुवारी दुपारी येथील रस्त्यावर उलटला होता. त्यात लिक्विड सोप असे लिहिलेली तीन हजार ३८४ खोकी होती. घटनास्थळी पोहोचलेले मुंब्रा वाहतूक (उपविभाग) शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांना खोक्यातून लिक्विड सोपऐवजी दुसऱ्याच प्रकारचा वास येत असल्याचे जाणवले. तसेच ते तेथे पोहोचताच ट्रकचा चालक तेथून पसार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
संशय बळावल्याने एक खोके फोडून बघितले असता, त्यात लिक्विड सोपऐवजी दारू असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे ही माहिती वरिष्ठ अधिकारी व तसेच स्थानिक पोलीस अधिकारी यांना दिल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, मुंब्रा पोलिसांनी टेम्पोमधील १२ लाख ३० हजार ७६० रुपायांची विविध प्रकारची दारू तसेच १० लाख रुपयांचा टेम्पो आणि ५० हजार रुपये किमतीचे लुमशिनचे सुटे भाग असा एकूण २२ लाख ८० हजार ७६० रुपायांचा ऐवज ताब्यात घेऊन बेकायदा दारूची वाहतूक करणारा टेम्पोचालक, क्लिनर तसेच त्यांना तसे करण्यास भाग पाडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
---------------