गुन्हे शाखेने केली दोघांना अटक
By admin | Published: April 7, 2016 01:11 AM2016-04-07T01:11:15+5:302016-04-07T01:11:15+5:30
फेब्रुवारीमध्ये शहापूर तालुक्यातील आटगाव येथील हरविंदर इंडस्ट्रीज येथे पडलेल्या दरोड्याची उकल करण्यात ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे
आसनगाव : फेब्रुवारीमध्ये शहापूर तालुक्यातील आटगाव येथील हरविंदर इंडस्ट्रीज येथे पडलेल्या दरोड्याची उकल करण्यात ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात २ आरोपींसह चोरीचा माल विकत घेणारे, मालवाहतुकीचा टेम्पो यासह चोरीचा मालदेखील जप्त केला आहे .
हरविंदर इंडस्ट्रीजमधील कंपनीत बायस्टोनीक लेझर तसेच पंचिंग मशीनचे उत्पादन होत असे. १७ फेब्रुवारीला दोघा अज्ञातांनी रखवालदाराला मारहाण करीत त्याच्याकडील २ मोबाइल व कंपनीतील ४२ हजारांच्या तांब्याच्या प्लेट सोबत आणलेल्या टेम्पोत घेऊन फरार झाल्याची फिर्याद शहापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अभय कुरुं दकर, पोउनि बी.ए. पाटील यांच्याकडे आल्यावर त्यांनी आपल्या खबऱ्यांना कामाला लावत गुन्ह्याचा छडा लावला. हा चोरीचा माल उल्हासनगर येथील भंगार व्यावसायिक समीर सगीर हासनी याला विकल्याचे कबूल केल्याने त्यालादेखील अटक करत ४० हजारांच्या तांब्याच्या प्लेट जप्त केल्या. दरोड्यासाठी वापरलेली गाडीदेखील जप्त करण्यात आली.
पोलीस हवालदार कैलास पाटील, काशिवले, जोशी, ठाकरे, गायकर, आघाव, राय, वारके यांनी मदत करत या गुन्ह्याची उकल केली. यातील मन्या या आरोपीवर यापूर्वीदेखील अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून पुढील तपास पोउनि बी.ए. पाटील करत आहेत. (वार्ताहर)