उत्तन भागात तीन मच्छीमारांच्या घरात चोऱ्या करणाऱ्यास गुन्हे शाखेने केली अटक
By धीरज परब | Updated: February 2, 2025 16:31 IST2025-02-02T16:31:00+5:302025-02-02T16:31:18+5:30
Bhayandar News: भाईंदरच्या उत्तन भागातील मच्छीमारांच्या घरांना लक्ष्य करत चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने अटक करून ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत .

उत्तन भागात तीन मच्छीमारांच्या घरात चोऱ्या करणाऱ्यास गुन्हे शाखेने केली अटक
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भागातील मच्छीमारांच्या घरांना लक्ष्य करत चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने अटक करून ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
मीरा भाईंदर शहरातील सर्वात कमी गुन्हे होत असलेल्या उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने मच्छीमारां मध्ये खळबळ उडाली होती. कोळीवाड्यात मच्छीमार हे त्यांच्या घरांना कडी लावून वा दार नुसते ओढून घेत त्यांच्या मासेमारी संबंधित वा घराशी संबंधित कामांना जात असतात.
मच्छीमारांच्या ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन पाळत ठेऊन चोऱ्या होऊ लागल्या . ह्या वाढत्या चोरी प्रकरणी उत्तन पोलीस तपास करत असतानाच वरिष्ठांच्या निर्देशा नुसार मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे, उपनिरीक्षक संदीप शिंदे सह अशोक पाटील, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, संजय शिंदे, संतोष लांडगे, मनोज चव्हाण, सचिन हुले, सुधीर खोत, अश्विन पाटील, प्रशांत विसपुते, धिरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे, किरण असवले व संतोष चव्हाण यांच्या पथकाने विविध दिशेने घरफोड्यांचा तपास सुरु केला.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीवरुन पोलिसांनी सुहेल जमील सिध्दीक्की ( वय २५ वर्षे ) रा. भवनस् कॉलेज जवळ, अंधेरी पश्चिम ह्याला ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेतले . सुहेल हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून त्याच्या कडे कसून तपास केल्या नंतर उत्तन भागात त्याने ३ मच्छीमारांच्या घरात चोऱ्या केल्याचे उघडकीस आले.
४ डिसेम्बर २०२४ रोजी हॅरल फ्रेडी बुनकवली रा. भाटेबंदर लाईट हाऊस जवळ हे जाळी विणण्यासाठी तर महिला वर्ग मासे सुकवण्यासाठी घराला कडी लावून गेले होते . त्यावेळी कडी उघडून चोरट्याने २ मोबाईल व कपाटाजवळ ठेवलेल्या चावीने कपाट उघडुन ३ सोन्याच्या अंगठ्ठया असा २० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता .
१२ डिसेम्बर रोजी मोठा गाव येथील विल्बन इजिदोर बांड्या यांच्या आई दाराला कडी लावून शेजारी गेल्या असता घरातील २ लाख ९५ हजारांचे दागिने चोरून नेले होते . तर मस्जिद गल्ली , मोठा गाव येथील वेलरीन मानको ह्या २७ जानेवारी रोजी सायंकाळी घराचा मागचा दरवाजा उघडा ठेऊन व पुढील दरवाजा ओढून घेत वळत घातलेले कपडे काढण्यासाठी गेल्या होत्या . त्यावेळी कपाटातील ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते . ह्या तिन्ही चोऱ्या सुहेल ह्याने केल्याचे कबूल केले आहे .