ठाण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रक्तदानाने केले नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:29 PM2020-12-31T23:29:53+5:302020-12-31T23:40:27+5:30
गुन्हे अन्वेषणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह ९७ पोलिसांनी गुरुवारी रक्तदान करुन नववर्षाचे स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गुन्हे अन्वेषणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह ९७ पोलिसांनी गुरुवारी रक्तदान करुन नववर्षाचे स्वागत केले. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, अशी शाबासकी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिली.
राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असल्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त फणसळकर यांनी रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर ठाण्यात याआधी सुमारे १५० पोलिसांनी रक्तदान केले. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी पुन्हा सिद्धी सभागृह येथे गुन्हे अन्वेषण विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना फणसळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप दिली. ते म्हणाले,
सध्या थॅलेसिमियासारख्या आजाराला तसेच कोविडमुळे उद्भवणाºया आजारांमध्येही अनेकदा रक्ताची गरज भासते. आपल्या रक्तदानामुळे कोणाचे तरी प्राण वाचतात. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून पोलिसांनीही रक्तदानासारख्या उपक्रमात सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. ठाण्यात रोटरीसारख्या संस्था असे उपक्रम निरंतर राबवितात. पोलिसांनीही योगदान देऊन आपला खारीचा वाटा उचलणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. या शिबिरामध्ये शंभर हून अधिक पोलीस कर्मचाºयांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला होता. परंतू, २० ते २५ कर्मचाºयांना रक्तदाब, मधुमेह आणि हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे त्यांना रक्तदान करता आले नाही. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्यासह ९७ पोलिसांनी रक्तदान केल्याची माहिती सूत्रांनी दिली.