भाजपाच्या चार नगरसेविकांवर गुन्हा, अटकेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:04 AM2018-03-20T02:04:41+5:302018-03-20T02:04:41+5:30
मीरा रोडच्या शांतीनगर भागात पालिकेच्या जलकुंभाच्या उद्घाटनावेळी शिवसेना नगरसेविका दिप्ती भट यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपाच्या रुपाली मोदी, हेतल परमार, वंदना भावसार, सीमा शाह या चार नगरसेविकांसह माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी व पदाधिकारी राधा नाडर यांच्यावर नयानगर पोलिसांनी दंगल, मारहाण आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर भागात पालिकेच्या जलकुंभाच्या उद्घाटनावेळी शिवसेना नगरसेविका दिप्ती भट यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपाच्या रुपाली मोदी, हेतल परमार, वंदना भावसार, सीमा शाह या चार नगरसेविकांसह माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी व पदाधिकारी राधा नाडर यांच्यावर नयानगर पोलिसांनी दंगल, मारहाण आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
शांतीनगर सेक्टर दोनमधील मैदानात पालिकेने बांधलेल्या जलकुंभाच्या गुढीपाडव्याला झालेल्या उद््घाटनावेळी श्रेयावरून हा वाद उद््भवला होता. भट यांचा फलक काढल्याने त्यांनी जाब विचारला. त्यांच्यासोबतच्या काही महिला उद्घाटन करण्यासाठी गेल्या आणि सुरु झालेल्या वादाचे पर्यवसान धक्काबुक्की व हाणामारीत झाले. पोलीस आल्यानंतर वाद सोडवण्यात आला.
भट यांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून पोलिसांनी भाजपाच्या चार नगरसेविकांसह एक माजी नगरसेविका आणि एक पदाधिकारी अशा सहा जणींविरुध्द सोमवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. भट यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
स्थानिक भाजपा नगरसेवकांकडून नेहमीच डावलले जाते, कामात अडथळे आणले जातात, असे फिर्यादीत नोंदवण्यात आले आहे. त्याचा संदर्भ आमदार सरनाईक यांनीही दिला आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शिष्टाचार पाळला नसल्याचा मुद्दा मांडला. शिवसेनेचे आमदार, खासदार यांना डावलण्यात आल्याचे ते म्हणाले. नयानगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.