शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:13+5:302021-03-16T04:41:13+5:30

ठाणे : भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांच्या दालनात घुसून त्यांना घेराव घालणाऱ्या शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह सुमारे ४० पदाधिकाऱ्यांवर बेकायदा ...

Crime filed against 40 people including seven Shiv Sena corporators | शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

Next

ठाणे : भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांच्या दालनात घुसून त्यांना घेराव घालणाऱ्या शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह सुमारे ४० पदाधिकाऱ्यांवर बेकायदा जमाव जमवून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली करणे, मास्क न लावणे यांसारख्या कलमांखाली ठाणे पोलिसांनी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कर्तव्यात कसूर केलेल्या सुरक्षा रक्षकांवरही महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. डुंबरे यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी त्यांना घेराव घातला होता. या घटनेची दखल घेऊन कारवाईची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली होती.

शिवसेनेच्या नगरसेविका राधिका फाटक, मीनल संख्ये, साधना जोशी, नगरसेवक दिलीप बारटक्के, विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर, राजू फाटक यांच्यासह ४० पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणे शहरात अनावश्यक तीन पादचारी पूल उभारून १३ कोटी रुपयांची लूट केली जात असल्याचा आरोप डुंबरे यांनी केला होता व या माध्यमातून शिवसेना निवडणूक निधी जमा करीत असल्याचा दावा डुंबरे यांनी केला होता. डुंबरे यांच्या या आरोपांमुळे संतापलेल्या नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली १००-१५० कार्यकर्ते डुंबरे यांच्या केबिनमध्ये घुसले. त्यांनी गटनेते डुंबरे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. आठ दिवसांत माफी मागण्यासाठी धमकी दिली. कोरोनाच्या काळात अशा प्रकारे गर्दी जमवून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. तसेच घेराव घालून घोषणाबाजी करताना अनेक नगरसेवक व पदाधिकारी यांनी मास्क परिधान केले नव्हते. हेही कोरोना नियमांचे उल्लंघन असल्याने त्याकरिताही गुन्हा दाखल झाला आहे. घेराव घालताना नियम पायदळी तुडविणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला होता.

या संदर्भात पोलीस आयुक्त फणसळकर यांना भाजपच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात पाचपेक्षा जास्त जणांचा जमाव जमविणे, तोंडास मास्क न लावणे आणि नियमांचे पालन न करणे याकरिता सात नगरसेवकांसह ४० पदाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (३), १३५ प्रमाणे, तसेच कलम १८८ भादंवि आणि साथरोग अधिनियम १८९७ चे कलम व ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप गटनेत्याच्या केबिनमध्ये इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा होण्यापूर्वी त्यांना रोखण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांवरही कारवाई करावी, अशी मागणी भाजपने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यानुसार कर्तव्यात कसूर करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई प्रस्तावित आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांकडून त्या दिवशी महापालिका मुख्यालयात सुरक्षा व्यवस्थेवर असलेल्या व डुंबरे यांच्या दालनात शिवसेनेच्या मंडळींनी घुसू नये ही जबाबदारी असलेल्या सुरक्षा रक्षकांची माहिती मागविली आहे. या बाबी पडताळून व सीसीटीव्ही फुटेज तपासून सुरक्षा रक्षकांवर कारवाई केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

..........

वाचली

Web Title: Crime filed against 40 people including seven Shiv Sena corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.