संशयितांवर उपचार न केल्यास गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:48 PM2020-05-30T23:48:00+5:302020-05-30T23:48:05+5:30
कोणतेही रुग्णालय रूग्णांस उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार देऊ शकत नाही, असे राज्य शासनाचे निर्देश आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील कोविड संशयित रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच संचालकांविरूद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा ठामपा आयुक्त विजय सिंघल यांनी शनिवारी दिला.
कोणतेही रुग्णालय रूग्णांस उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार देऊ शकत नाही, असे राज्य शासनाचे निर्देश आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी कोविड संशयित सिमटोमॅटिक रुग्णांना खासगी नॉनकोविड रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबतचा आदेश नुकताच जारी केला आहे. यानुसार अशा रुग्णालयांनी कोविड संशयित रूग्ण दाखल झाल्यास त्याच्या प्रकृतीस्वास्थ्यानुसार आवश्यकता असल्यास आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करून घ्यावे. नंतर उपचार करून त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर आश्यकता वाटली तर त्याचे स्वॅब कोरोना कोविड तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठववावेत. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास तो रुग्ण ज्या रुग्णालयात दाखल आहे,तेथेच त्याच्यावर उपचार करावेत. तथापि, त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यास पुढील उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करावे, असे स्पष्ट केले आहे.
एखाद्या खासगी रुग्णालयाने रुग्णास दाखल करून उपचार करण्यास नकार दिल्यास अथवा रुग्णास इतर रुग्णालयांमध्ये पोहोचण्यास विलंब झाल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास अशा रुग्णालयांविरूद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित करून रुग्णालयांच्या संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
निवृत्तीच्या दिवशी कोरोनाने उपकर निरीक्षकाचा मृत्यू
ठाणे : ठाणेमहापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या उपकर निरीक्षकाचा कोरोनाशी सुरू असलेला २० दिवसांचा लढा अखेर अपयशी ठरला आहे. शनिवारी या योद्धयाने निवृत्तीच्या दिवशीच अखेरचा श्वास घेतला. महापालिकेच्या निष्काळजीपणाचा तोही बळी ठरल्याचे आता पुन्हा समोर आले आहे.
५५ वर्षे वयांवरील व्यक्तींना कोरोनासंबंधित कोणतीही ड्युटी लावू नये, असे असतानाही त्यांना भार्इंदरपाडा येथील क्वॉरंटाइन सेंटरची जबाबदारी दिली होती. परंतु, शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.
ते ११ मे रोजी कोरोनामुळे घोडबंदरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु, दुसºयाच दिवशी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने ते पुन्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. त्यातच शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांची पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु, त्यातून ते दोघेही बरे झाले आहेत. असे असले तरी कोरोनाच्या या लढाईत उपकर निरीक्षकाची हार झाली.
कल्याणमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू
कल्याण पूर्वेत २४, पश्चिमेत पाच तर डोंबिवली पूर्वेत नऊ रुग्ण आढळले आहेत. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा व कर्पेवाडी परिसर, डोंबिवलीत तुकारामनगर आणि कल्याण पश्चिमेत जोशी बागेत रुग्णांची संख्या मोठी आहे.
नव्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील चार वर्षांच्या दोन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराअंती बरे झालेल्यांची संख्या ३३४ आहे. तर, उपचार घेत असलेल्यांची संख्या ६१८ आहे.
कोरोनाग्रस्तांना रात्रीच्या जेवणातही दुपारची भाजी
अंबरनाथ : नगरपालिकेच्या सिटी रुग्णालयामध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याची तक्रार रुग्ण करीत आहेत. दुसरीकडे, शुक्रवारी दुपारी जेवणात जी भाजी दिली होती, तीच रात्रीच्या जेवणातही दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे. कोरोनासारख्या गंभीर आजार झाल्याने रुग्ण हे मानसिक तणावाखाली असताना. त्यांना उपचारादरम्यान पौष्टिक आहार देणे हे बंधनकारक आहे. मात्र, जेवण पुरविणारा कंत्राटदार हा जेवणाच्या बाबतीत रुग्णांना नाहक त्रास देत आहे. शुक्रवारी कंत्राटदारामार्फत देण्यात आलेल्या जेवणात दुपारच्या वेळेस सोयाबीनची भाजी दिली होती.
रात्री तीच भाजी येणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी कंत्राटदार व प्रशासनाची आहे. मात्र, दुपारी आलेली भाजी पुन्हा रात्रीच्या जेवणात देण्यात आली. दुपारची उरलेलीच भाजी पुन्हा रात्रीच्या जेवणात दिल्याचा आरोप येथील रुग्णांनी केला आहे. रात्री देण्यात आलेल्या भाजीत केवळ बटाटा टाकून सोयाबीन बटाटा अशी भाजी देण्यात आली. दरम्यान, रुग्णांना देण्यात येणाºया जेवणाच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असल्याने प्रशासक जगतसिंग गिरासे आणि मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांनी कंत्राटदाराला शेवटची ताकीद दिली असून जेवणात सुधारणा झाली नाही तर त्याचे कंत्राट रद्द केले जाईल असे स्पष्ट केले आहे.