अभिनेत्रीबाबत अश्लील वक्तव्याप्रकरणी गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 02:54 AM2020-02-24T02:54:09+5:302020-02-24T02:54:18+5:30
पोलिसांचा वेळकाढूपणा; ओळखीशिवाय फिर्याद न घेणे लज्जास्पद
मीरा रोड : मराठी अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे यांच्या फेसबूकवर अश्लील भाषेत प्रतिक्रिया देणाऱ्या तरुणाविरोधात नयानगर पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. याबाबत तक्रार करायला गेलेल्या मेघा यांना पोलिसांचा वाईट अनुभव आला. जवळपास सव्वातास थांबवून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. मात्र नंतर ओळखीच्या माध्यमातून रात्री गुन्हा दाखल करुन घेण्यात आला. सायंकाळी साडेसातपासून मध्यरात्री सव्वाबारापर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात थांबावे लागले. एका पीडित महिलेची तक्रार घ्यायलादेखील ओळख लागते, हा प्रकार लज्जास्पद असल्याचा संताप मेघा यांनी व्यक्त केला.
मीरा रोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्समध्ये राहणाºया मेघा यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर एका मराठी चित्रपटातील लावणी नृत्य प्रसंगाचे सहकलाकारासोबतचे छायाचित्र पोस्ट केले होते. सरुप पांडा नावाच्या फेसबूक खातेधारकाने अतिशय अश्लील प्रतिक्रिया लिहिल्या होत्या. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्या मीरा रोडमधील नयानगर पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास पोहचल्या. त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी वेळकाढुपणा चालवला. शेवटी तक्रार अर्ज देऊन त्या पोलीस ठाण्यातून नाइलाजाने निघून गेल्या.
वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे हे सायंकाळी पोलीस ठाण्यात आल्यावर साडेसातच्या सुमारास मेघा पुन्हा नयानगर पोलीस ठाण्यात पोहचल्या. तेथे त्यांनी घडला प्रकार सांगितल्यावर बर्वे यांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास सांगितले. गुन्हा दाखल होईपर्यंत मध्यरात्र झाली. फेसबूकवरील माहितीवरुन पांडा हा ओरिसातील बरगढ भागातला रहिवासी असल्याचे कळते. ओळखीशिवाय पोलीस ठाण्यात फिर्याद घेतली जात नाही का? माझी ओळख निघाली म्हणुन गुन्हा दाखल झाला. पण जर ओळख नसती तर काय, असा सवालही त्यांनी केला.
नीलम गोºहेंचा पुढाकार
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्या कानावर हा प्रकार आल्यानंतर त्यांच्यामार्फत एका महिला अधिकाºयाने मेघा यांच्याशी संपर्क केला. गुन्हा दाखल होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा सुरू होता. मेघा यांच्या एका मैत्रिणीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सुधीर कुडाळकर यांना पोलीस तक्रार घेत नसल्याचे कळवले. कुडाळकर यांनीसुध्दा ठाणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांना तक्रार घेण्यास सहकार्य करण्यास सुचवले.