विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 09:24 PM2018-02-23T21:24:45+5:302018-02-23T21:24:45+5:30
शाळेतील विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली शिक्षक रघुनाथ हरड याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयंभगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवली : शाळेतील विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली शिक्षक रघुनाथ हरड याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयंभगाचा गुन्हा दाखल झाला आहे. गैरवर्तनाचा प्रकार अनेक दिवसांपूर्वी उघड होऊनही शाळेने तसेच संस्थाचालकांनी याप्रकरणी कोणतीही तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केलेली नव्हती, अखेर अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांना ही घटना समजताच त्यांच्या पुढाकाराने पीडित मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
डोंबिवली पूर्वेकडील दावडी परिसरातील आरटीपी मराठी विद्यालयात हा प्रकार घडला आहे. 8 फेब्रुवारीला या शाळेतील इयत्ता दुसरी ते सहावीपर्यंतच्या मुलांसाठी सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श या विषयांवर मुलांचे प्रबोधन होण्यासाठी व मुलांमध्ये आपली स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने चाइल्डलाइन इंडिया फाऊंडेशन अंतर्गत १० मिनिटांची चित्रफीत दाखविली. ती चालू असताना इयत्ता सहावीच्या मुली रडायला लागल्या. ते हेरून सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मुलींशी केलेल्या चर्चेत त्यांच्याबरोबर शाळेतील शिक्षक रघुनाथ हरड याने असुरक्षित स्पर्श केल्याचे समोर आले. याचा संपूर्ण तपशील शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आला. त्यावर शाळेने संबंधित शिक्षकावर निलंबनाची देखील कारवाई केली. पण हा प्रकार पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान शुक्रवारी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलीस ठाण्यात शिक्षक हरड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन विद्यार्थिनींच्या बाबतील गैरवर्तनाचा प्रकार घडल्याचे बोलले जाते.
माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ
दरम्यान यासंदर्भात माहिती देण्यास मानपाडा पोलिसांनी टाळाटाळ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पत्रकारांनी पोलीस ठाण्यात असलेल्या ठाणे अंमलदाराला विचारणा केली असता गुन्हा दाखल आहे. परंतु गुन्हा दाखल करणा-या महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव याचं तुम्हाला माहिती देतील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. जाधव यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून देखील गुन्हा दाखल असल्याचे सांगत माहिती देण्यास नकार दिला. तुम्ही वरिष्ठांना भेटा आणि मगच माहिती देते असे त्यांनी सुनावत टाळाटाळ केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल्ले हे त्यांच्या कक्षात एका बैठकीत व्यस्त होते. बराच वेळ होऊनही बैठक संपत नसल्याने त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर यावेळी ठाणे अंमलदारांकडून कल्याण नियंत्रण कक्षातून माहिती घ्या, असेही सांगण्यात आले. अखेर कल्याण नियंत्रण कक्षाला संपर्क केला असता मानपाडा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा आलेला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.