अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मजुराला सात वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:29 AM2018-12-24T04:29:15+5:302018-12-24T04:29:34+5:30
बांधकामाच्या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या २२ वर्षीय गणेश वाढोळे या मजुराला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी २० डिसेंबर रोजी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
ठाणे : बांधकामाच्या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या २२ वर्षीय गणेश वाढोळे या मजुराला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी २० डिसेंबर रोजी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून जिल्हा मुख्य सरकारी वकील संजय लोंढे यांनी काम पाहिले.
बुलडाणा येथील आरोपी वाढोळे हा नवघर परिसरात बांधकामाच्या ठिकाणी काम करून तिथेच राहत होता. येथे पीडित मुलगी कुटुंबासोबत राहत होती. या कुटुंबीयांशी आरोपीची ओळख होती. त्याने ७ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटेच्या सुमारास पीडित मुलीला घरी बोलवून घेतले होते. आली नाहीस तर अत्याचार करण्याची धमकीही त्याने दिली. ती घरात आल्यावर त्याने तिच्यावर अत्याचार केला. तिने झालेला प्रकार पालकांना सांगितला असता, त्याच्याविरोधात तिच्या पालकांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, भादंवि ३७६ आणि पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायाधीश पटवर्धन यांच्या न्यायालयासमोर हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी आले. सरकारी वकील लोंढे यांनी पीडितेसह १५ साक्षीदारांची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावे सादर केले. ते पुरावे ग्राह्यमानून आरोपी गणेशला न्यायालयाने दोषी ठरवले.