Crime News: व्हॉट्सएप डीपी वर ओळखीच्या फोटोमुळे फसवणूक
By धीरज परब | Published: February 15, 2023 04:13 PM2023-02-15T16:13:09+5:302023-02-15T16:13:33+5:30
Crime News: ओळखीच्या व्यक्तीचा व्हॉट्स ऍप डीपीवर फोटो लावून २० हजार रुपये उकळणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मीरारोड - ओळखीच्या व्यक्तीचा व्हॉट्स ऍप डीपीवर फोटो लावून २० हजार रुपये उकळणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदरच्या आरएनपी पार्क मध्ये राहणारे देवकीनंदन मोदी यांनी अंधेरीच्या भरत बिष्णोई यांना डायरी बनवण्याचे काम दिले होते . मोदी यांना व्हॉट्सएप डीपी वर भरतचा फोटो असलेल्या क्रमांकावरून संदेश आला कि , आपण अडचणीत असून २० हजार रुपयांची गरज आहे व सायंकाळी परत देतो. मोदी यांनी बँक खाते क्रमांक मागितला असता समोरच्या व्यक्तीने व्हॉट्सअप वरच बँक खात्याचा क्रमांक व आयएफसी कोड पाठवला . मोदी यांच्या खात्यात तेवढी रक्कम नसल्याने त्यांनी त्यांचा भाचा हेमंत अग्रवाल ह्याला पैसे पाठवण्यास सांगितले . हेमंत यांनी मामाने दिलेल्या खाते क्रमांकावर २० हजार रुपये पाठवले.
त्या नंतर पुन्हा त्या व्हॉट्सअप वरून मोदी यांना मॅसेज आला कि , पत्नी आजारी असल्याने आणखी २० हजार रुपये हवे आहेत . मोदी यांनी त्यांच्या कडे असलेल्या भरतच्या क्रमांकावर कॉल केला असता भरत यांनी आपला मोबाईल हॅक झाला असून पैसे पाठवू नका असे सांगितले . भरत यांचा फोटो डीपीवर ठेऊन व्हॉट्सअप द्वारे आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर मोदी यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे .